Zika Virus: कोरोनापाठोपाठ आता राज्यात झिका व्हायरसचा धोका, वेळीच जाणून घ्या लक्षणं By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:50 PM 2022-07-14T17:50:46+5:30 2022-07-14T17:59:59+5:30
झिका व्हायरसवर कोणतंही औषध उपलब्ध नाही किंवा लस नाही. त्यामुळे हा व्हायरस धोकादायक ठरू शकतो. जाणून घेऊया त्याची लक्षणं राज्यात कोरोनाची प्रकरणं वाढत असतानाच आता झिका व्हायरसचं संकट आलं आहे. वर्षभरानंतर पुन्हा झिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे.
पालघर जिल्ह्यातील जोई येथील आश्रमशाळेतील 7 वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील बेलसर (belasar) येथे 50 वर्षांच्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाली होती.
झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलात राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.
1950 पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला,. 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं.
झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत.
मार्च 2016 पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे हा संसर्ग अधिक धोकादायक आहे.
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं.
ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.
झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. You