सुधारक ओलवे (छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’समूहाचे फोटो एडिटर आहेत.) वा-याच्या तालावर झुलणारी नारळाची झाडं, गोड गळ्यानं गाणारे सुरेल पक्षी आणि निसर्गानंच एखादं सुंदर वस्त्र विणावं तशी नटलेली विलोभनीय धरती.केरळ.बहुविध संस्कृती आणि तितक्याच भौगोलिक विविधतेचं अद्भुत मिश्रण असलेला देशातला एक नितांत सुंदर भूभाग. एका बाजूनं अपार देखणा अरबी समुद्र आपलं स्वागत करतो, तर दुस-या बाजूला शांत, नितळ बॅकवॉटर आपल्याला सुखावून जातं. केरळात प्रत्येकासाठी काहीतरी खास आहे. कॅमे-यामागे उभ्या फोटोजर्नलिस्टसारखाच, केरळ स्वत:चीच अद्भुत रूपं टिपत जातो.‘गॉड्स ओन कण्ट्री’ असं केरळचं वर्णन केलं जातं, ते काही खोटं नव्हे. तुम्ही वर्कलचे समुद्रकिनारे पाहता, त्याला लागून असलेल्या टेकडय़ा, मासेमारीसाठी आलेले मच्छीमार, झाडावरून नुकतीच काढलेली शहाळी विकणारी माणसं आणि पायाला लागणारी नितळ पाण्यातली मऊशार माती हे सारं पर्यटकांना वर्षभर भुरळ घालत राहतं.बॅकवॉटरचं पाणी हिरव्यागार-निवांत खेडय़ांमधून झुळझुळत राहतं. छोटय़ा-इटुकल्या बोटी घेऊन लोकं त्या बॅकवॉटरमधून प्रवास करतात आणि मोठय़ा हाऊसबोट्सही पर्यटकांना घेऊन जातात. बॅकवॉटरचं हे प्रवासजाळं या वातावरणातही निसर्गाशी संपूर्ण जवळीक जपतं. आणि सगळ्यात महत्त्वाची अन् केरळची खरी ओळख सांगणारी इथली माणसं. शेकडो वर्षाचा वारसा त्यांनी आजही जपून ठेवला आहे. त्यांच्या संस्कृतीचा, संगीताचा आणि नृत्याचा हा वारसा केरळी माणूस मनापासून जपताना दिसतो.केरळची ओळख सांगणारी कथकली ही लोकनृत्यकला हे त्याचंच एक उदाहरण. ही नृत्यकला खोलवर एक आध्यात्मिक नातं सांगते. वर्षानुवर्षे कथकली नर्तकांचं प्रशिक्षण चालतं. त्यांच्या नृत्यकौशल्याचा कसून सराव करवला जातो. कथकली नृत्यकलाकारांच्या चेह:यावर जे रंग लावले जातात तेही सगळे नैसर्गिक म्हणजे भाजी आणि फळांपासून बनवलेले असतात. त्यांचा प्रत्यक्ष नृत्याविष्कार, प्राचीन काळातल्या नाटुकल्या, महाभारतातल्या गोष्टी, पारंपरिक कथकली नृत्यशैली पाहणं, अनुभवणं हे एकप्रकारे त्या काळात जाऊन आल्यासारखंच वाटतं.केरळ आपल्याला एका अशा काळात घेऊन जातं, ज्या काळात माणूस आणि निसर्ग एकत्र राहायचे. प्रेमानं. आत्यंतिक एकरूपतेनं. निसर्ग आणि माणसाची ही एकतानता पाहण्यासाठी आयुष्यात किमान एकदा तरी केरळला जायलाच हवं!