क्षण-चित्र - सुधारक ओलवे1929 चा काळ. देशात स्वातंत्र्य चळवळ जोर धरत होती, तेव्हा दूर हिमालयाच्या पायथ्याशी ऐन विशीतली एक मुलगी अल्बेनियातून येऊन पोहचली. दार्जिलिंगच्या एका शाळेत ती इंग्रजी आणि बायबल शिकवत असे. तिचं नाव अॅगिस गोंकशे बोजशियू (Anjezë Gonxhe Bojaxhiu). गोंकशे म्हणजे गुलाबाची कळी किंवा इटुकलं फूल. अर्थात तिचं हे पूर्वीचं नाव तिनं भारतात कधीही वापरलं नाही. ती ‘नन’ झाली, तिनं नवीन नाव स्वीकारलं आणि त्यानंतर भारतात सारे तिला मदर तेरेसा म्हणून ओळखू लागले. या फोटो फीचरसाठी फोटो निवडायचे म्हणून मी माझ्याकडच्या ‘निगेटिव्ह’ चाळत होतो, तेव्हा त्या संग्रहात अचानक मदर तेरेसांचा फोटो दिसला आणि जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या. त्याकाळी फोटोग्राफर म्हणून काम करायला मी नुकती सुरुवात केली होती. 1990 मध्ये मी पहिल्यांदा त्यांना मुंबईत पाहिलं. त्या त्यांच्या इतर सहका-यांसह मिशनरी कामासाठी मुंबईत आलेल्या होत्या. साधीशीच निळ्या काठांची पांढरी साडी. गळ्याजवळ असलेला क्रॉस. छोटय़ा चणीची, किरकोळ तब्येतीची ही महिला, पण तिच्या चेह-यावरच्या हास्यात हजारे सूर्याचा तेजस्वी लख्ख प्रकाश होता. आजही त्यांच्या डोळ्यात तीच चमक होती, जी एकेकाळी आयर्लण्ड सोडून भारतात येताना विशीतल्या मुलीच्या डोळ्यात चकाकली असेल. आपण मिशनरी होणार या उमेदीनं चकाकलेले ते डोळे अजूनही तसेच तेजपुंज होते. छोटी छोटी पाऊलं उचलत त्या सावकाश चालत होत्या. पण त्या चालीत एक प्रकारचा आदबशीर डौल होता. जाता जाता ज्या ज्या हातांना, चेह-यांना त्यांनी स्पर्श केला ते सारे चेहरे अचानक लख्ख उजळले, एरवी जो आत्मानंद माणसांच्या चेह-यावर उमटत नाही, जाणवतही नाही तो त्या चेह-यांवर दिसू लागला.जातीय हिंसा, तणाव हे सारं शिगेला पोचलेलं असताना, 1943 मध्ये बंगालनं भीषण दुष्काळ अनुभवला. गरिबी, भूकमरी, रोगराई या सा-यानं कोलकात्यातील माणसं होरपळत होती. आणि तेव्हाच 1946 मध्ये आपल्या ‘अंतर्आत्म्याच्या हाकेला’ ओ देत मदरने गरिबांची सेवा करायचं ठरवलं. गरिबातल्या गरीब माणसाच्या सेवेसाठी जायचं तर मदरकडे काय होतं? साधं प्राथमिक वैद्यकीय प्रशिक्षण आणि गरिबांसाठी तळमळ. तेवढंच घेऊन त्यांनी आपल्या मिशनचं काम सुरू केलं. उभं केलं.मदरने मुंबईला अनेकदा भेट दिली आणि त्यांच्यातल्या सकारात्मक ऊर्जेनं प्रत्येकवेळी मला त्यांचे फोटो काढायला खेचून नेलं. त्या गरिबांशी बोलत, वस्त्यांमध्ये जात, लहानग्या लेकरांशी हसून गप्पा मारत. माझं भाग्य थोर म्हणून अशा महान व्यक्तीच्या अत्यंत समीप उभं राहून मला त्यांचे फोटो काढता आले. जी माणसं इतरांना नकोशी झाली त्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर नि:स्वार्थ माया करणं हे सारं जो समाज विसरत चाललाय त्या समाजात मदरचं कामच एक बोलकं उदाहरण आहे. त्यांनी कुष्ठरोग्यांच्या भळभळत्या जखमांवर मलमपट्टी केली, गरिबांना अंघोळी घालत त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्यासाठी हीच ईशसेवा होती. त्यांना नोबेल पुरस्कार लाभला. एका पत्रकारानं ‘द लिव्हिंग सेण्ट’ म्हणून त्यांचा गौरव केला. व्हॅटिकन लवकरच त्यांना संतपद बहाल करणार असल्याचा लेख मी वाचला आणि त्यानंतर दुस:याच दिवशी मदरचा हा माझ्या संग्रहातला फोटो समोर आला.प्रेम आणि सेवाभाव यांच्या मदतीनं त्यांनी माणसांच्या जगण्यावर मायेची जादू केली. एका सुंदर, पीडाविहिन जगाची त्यांनी कामना केली. दिवस अविश्वासानं काळवंडले, माणुसकीवरचा विश्वास हादरला अशा काळातही मदरनं अडल्यानडल्या माणसांना शक्य ती सारी मदत केली. म्हणून इतक्या वर्षानंतरही मदरची जादू कायम आहे. ही छोटी गुलाबाची कळी कायम उमलते आहेच. आजही. ..आणि पुढेही कायम उमलत राहील!