'तू अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहेस का?', याबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 05:05 PM 2022-10-27T17:05:18+5:30 2022-10-27T17:09:25+5:30
Ashok Saraf And Nivedita Saraf : मराठी चित्रपटसृष्टीतील ही अभिनेत्री अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. या गोष्टीबद्दलचा किस्सा आणि त्याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सायली संजीवने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. नुकत्याच सायलीच्या गोष्ट एका पैठणीची या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सायली संजीव ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. या गोष्टीबद्दलचा किस्सा आणि त्याबाबतचा खुलासा खुद्द सायलीनेच एका मुलाखतीमध्ये केला आहे.
एका रेडिओ चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये सायलीला एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता की, ‘तुम्ही अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहात का? त्यावर सायलीने उत्तर दिले की, ‘असे तुम्ही समजू शकता. माझी काहीच हरकत नाही…’
त्यानंतर सायलीने पुढे सांगितले, ‘असा प्रश्न अनेकांनी मला याआधीही विचारला आहे.
माझ्या वडिलांचे नाव संजीव चंद्रशेखर आणि आईचे नाव शुभांगी चंद्रशेखर आहे.’ लोकांचा असा गैरसमज का होतो, असा प्रश्न सायलीला विचारला.
त्यावर सायलीने उत्तर दिले की, ‘मी खूपशी निवेदिताताई सारखी दिसते. अशोक मामा आणि निवेदिता ताईला मुलगी नाही. त्यामुळे असा अनेकांचा समज होतो. अर्थात अशोक मामा आणि निवेदिता ताईने नेहमीच मला मुलीसारखे वागवले आहे.
सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. सायलीने यामध्ये गौरी ही भूमिका साकारली होती.
‘काहे दिया परदेस’ मालिका २०१६ मध्ये प्रसारित झाली होती. तिचे ४४० भाग प्रसारित झाले.सायली संजीवसह या मालिकेत ऋषी सक्सेना, सुलभा देशपांडे, मोहन जोशी, शुभांगी गोखले यांनी काम केले होते.
सायली संजीवने मालिकेनंतर चित्रपटातही काम केले आहे. एबीसी या सिनेमात ती झळकली आहे. तसेच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ सिनेमातही तिने काम केले आहे.