Nagpur Violence: नागपूर हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खानची संपूर्ण कुंडली; कसा रचला होता कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:17 IST2025-03-19T15:59:22+5:302025-03-19T16:17:59+5:30

सोमवारी रात्री नागपूरात अचानक हिंसाचार उफाळून आला. याठिकाणी २ गटातील वादात जाळपोळ, दगडफेक झाल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यात या हिंसाचारामागील मास्टरमाईंड कोण होता याचा खुलासा आता झाला आहे. नागपूरात हिंसाचार भडकण्यामागे मुख्य आरोपी ३८ वर्षीय फहीम शमीम खानचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शमीम माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. फहीम खानने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात त्याने नशीब आजमवलं. फहीमनं दिलेल्या चिथावणीखोर भाषणानंतर समुदाय आक्रमक झाला त्यानंतर नागपूरात हिंसा भडकली असं पोलिसांनी म्हटलं आहे.

माहितीनुसार, फहीम शमीम खान नागपूरच्या संजय बाग कॉलनीतील यशोधरा नगर येथे राहणारा आहे. याआधीही अनेक वादात त्याचे नाव समोर आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीकडून नागपूर मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा होता, ज्यात त्याचा दणदणीत पराभव झाला.

निवडणुकीच्या मैदानात उतरल्यापासून तो राजकारणात सक्रीय झाला होता. शहरात त्याची पकड मजबूत करण्यासाठी तो प्रयत्नशील होता. नागपूर हिंसाचार घडवण्याचा आधीच कट रचला होता. फहीम खानने त्यासाठी काही कट्टरपंथी लोकांना एकत्रित करून सूनियोजितपणे दंगल भडकवण्याचे काम केले असं पोलीस तपासात समोर आले आहे.

हिंसाचाराच्या एक दिवस आधी गणेशपेठ ठाण्याबाहेर MDP च्या नेत्यांनी एकत्रित येत औरंगजेब जिंदाबाद नारे लावले होते. त्यावेळी फहीम खानही तिथे उपस्थित होता. जमावाला एकत्रित करून त्यांना चिथावणी देण्याचं काम यात फहीम खाननेच मुख्य भूमिका निभावली असं तपासात पुढे आले आहे.

सोमवारी रात्री मध्य नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात तणाव वाढला तसा काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात ३४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरली, एका समुदायाने धार्मिक पुस्तक जाळले, त्यानंतर वातावरण आणखी चिघळलं.

निवडणुकीत पराभवानंतर फहीम खानने त्याच्या समर्थकांची फौज तयार केली होती. त्याच्याविरोधात याआधीही गंभीर गुन्हे आहेत. नागपूर हिंसाचारानंतर दंगल भडकवण्याच्या आरोपात त्याला पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातंर्गतही पोलीस त्याच्यावर कारवाई करण्याचा विचार करत आहे.

फहीम खानची कॉल डिटेल्स, सोशल मीडियावरील हालचाली याचा तपास पोलीस करत आहेत. फहीम खानच्या अटकेनंतर त्याच्या नेटवर्कचा खुलासा केला जाणार आहे. नागपूरातील हिंसाचार पूर्वनियोजित होता. अनेक इमारती दगड, शस्त्रे आधीच ठेवली होती. दंगल घडवणारे शहरातीलच होते असं पोलिसांनी सांगितले होते.

बिघडलेली कायदा सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात कर्फ्यू लावला. नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आतापर्यंत ५० हून अधिक जणांना अटक केली आहे. ज्यात मुख्य आरोपी फहीम खान याचाही समावेश आहे. सध्या नागपूरात परिस्थितीत नियंत्रणात आहे असं पोलीस आयुक्तांनी सांगितले.

खबरदारी म्हणून अद्यापही शहरातील काही भागात कर्फ्यू आहे. नागपूरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपौली, शांतनगर, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कर्फ्यू लावला असून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात आहेत.