In Subcapital Rangotsav 'Lai Heavy' enthusiasm: youthful, oldage and childish colors
उपराजधानीत रंगोत्सवाचा ‘लई भारी’ उत्साह : तरुणाई, आबालवृद्ध रंगले रंगात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 08:49 PM2019-03-22T20:49:56+5:302019-03-22T21:07:17+5:30Join usJoin usNext ‘आला होळीचा सण लई भारी चल नाचूया..., होरी खेले रघुवीरा..’ तर कुठे ‘रंग बरसे...’ आनंद, उत्साह आणि सळसळत्या तरुणाईच्या तनामनाला भिजवून टाकणारा रंगोत्सव गुरुवारी उपराजधानीच्या गल्लोगल्ली साजरा झाला. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी...’ असे म्हणत धुळवडीच्या विविधरंगी रंगांमध्ये नागपूरकर रंगून गेले. शहरातील रस्ते, सोसायट्या, मैदाने, वस्त्या असे सर्व जणू लाल, नीळा, पिवळा, गुलाबी अशा विविध रंगांनी भरून गेले होते. बच्चे कंपनी, तरुण-तरुणींनी रंगोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. पण प्रौढ आणि ज्येष्ठही मागे नव्हते. आबालवृद्धांनीही बेधुंदपणे रंगांची उधळण एकमेकांवर केली आणि सर्व आसमंत भारतीय संस्कृतीच्या रंगांनी न्हाऊन निघाला होता. होळी हा हिंदूंचा पारंपरिक सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत असतो व दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तोच उत्साह लोकांमध्ये होता. परस्परांवर पाणी व रंगांची उधळण करून लोकांनी ‘हॅपी होळी’च्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ‘होली है...’च्या आरोळ्यांनी सर्वत्र धूम चालली होती. अनेकांनी इमारतींच्या गच्चींवरून रंगीत पाण्याचे फुगेही फेकले. गल्लोगल्ली डीजेवर होळीच्या गीतांनी वातावरण उत्साहमय केले होते व या गीतांवर डान्सचा ठेका धरत एकमेकांना रंग लावण्याची, रंग भरलेल्या पिचकारीतून ओले करण्याची उत्साही स्पर्धा चालली होती. ‘रंग बरसे भिगे चुनरवाली..., होरी खेले रघुवीरा...’ अशा होळी स्पेशल गाण्यांवर महिला-पुरुषांनी मनसोक्त आनंद घेतला. परस्परांना मिठाईचे वाटप करून विविध गाण्यांवर नृत्य करून सर्वांनी होळीचा आनंद द्विगुणित केला. सर्वत्र गुलाल व रंगांची उधळणही सुरू होती. ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत एकमेकांना कोरडे नैसर्गिक रंग लावून धुळवड साजरी करण्यात आली. रंगाने माखलेले चेहरे घेऊन युवक-युवतींनी दुचाकींवरून शहरात फेरफटका मारला. मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद द्विगुणीत केला. हुताशिनी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सण असतो. होळीचा असाच माहोल सर्वत्र सुरू होता. बच्चे कंपनीही रंगपंचमी खेळण्यासाठी सकाळपासूनच घराबाहेर पडली होती. विविध प्रकारच्या पिचकाºया, पाण्याचे फुगे घेऊन लहान मुले एकमेकांच्या अंगावर रंगांची बरसात करत होते. सर्वत्र रंगीबेरंगी चित्र दिसत होते. बादल्यांमध्ये रंगाचे पाणी करून चिंब भिजेपर्यंत मुले एकमेकांना रंग लावत होती. नैसर्गिक रंगांचा वापर सगळीकडे दिसून आला. तर काही ठिकाणी तरुणांकडून ऑईल पेंट,केमिकल रंगांचाही वापर करण्यात आल्याचे दिसून आले. महिलांनी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. एकमेकींच्या घरात जाऊन नैसर्गिक रंग लावून होळी साजरी करण्यात आली. पारंपरिक सणांची प्रथा जपत नव्या पिढीने आधुनिक पद्धतीने रंगपंचमी साजरी करून सणाचा आनंद लुटला. इकोफ्रेंडली व कोरडी रंगपंचमी साजरी करण्यावर काहींचा भर दिसला. सर्वांना आनंद देणारा हा सण उत्साहात साजरा करण्यावर सर्वांचा भर दिसत होता. या सणाला साजेसेच वातावरण गुरुवारी शहरात होते. तरुणाईने एकमेकाला रंग लावत व रंगांची उधळण करत आयुष्याचा प्रत्येक क्षण सप्तरंगांप्रमाणेच असावा, याचे दर्शन घडवले. आजच्या पिढीला पर्यावरणाचे भान चांगलेच असल्याचे चित्र यंदाच्या रंगपंचमीला दिसून आले. होळीपासून रंगपंचमी साजरी करण्याच्या दिवसापर्यंत अनेकांनी आपल्या मित्रमैत्रिणींना समूह माध्यम (सोशल मीडिया)वरून शुभेच्छा देताना पर्यावरणाचेही भान ठेवण्याचे संदेश दिल्या गेले. यंदा अनेकांनी कोरडी रंगपंचमी खेळत आपले सामाजिक भान जपले. व्हॉटसअप, फेसबुक या सोशल माध्यमातून दिल्या जाणाºया सामाजिक संदेशाचे भान ठेवत अनेकांनी यंदा रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर कमी केल्याचेच चित्र सर्वत्र दिसून आले. टॅग्स :होळीHoli