जागतिक मानसिक आरोग्य दिन; आनंदी व यशस्वी आयुष्यासाठी असलेले सोपे मंत्र By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 07:00 AM 2020-10-10T07:00:00+5:30 2020-10-10T07:00:07+5:30
नागपूर: भावनिक सजगता / संवेदनशीलता ही एक शिकता आणि वाढवता येऊ शकणारी क्षमता आहे. जसं गाण्यात रस घेऊन ते ऐकत राहिल्यानंतर माणूस गायक नसला तरीही जाणकार रसिक बनू शकतो तशीच भावनांची जाणही विकसित करता येऊ शकते. त्यासाठी काही मूलभूत तत्वं समजून घेऊन पाळावी लागतात. स्वत:च्या आणि दुसऱ्यांच्या वागण्याचं निरीक्षण करावं लागतं. भावनांची एकूणच समज आल्यानंतर भावनिक समायोजन जमायला लागतं, तेव्हा नाती खऱ्या अर्थाने समृद्ध होतात. पुण्यातील ज्येष्ठ समुपदेशक निलिमा किराणे यांनी खास लोकमतच्या वाचकांसाठी दिले आहेत काही मंत्र. १) सतत सूचना दिलेल्या कुणालाच आवडत नाहीत. आईवडीलांकडून मुलांना (यामध्ये ज्येष्ठ पालकही आले) आणि पती पत्नींकडून परस्परांना किती बारीक बारीक सूचना दिल्या जातात, याचं प्रत्येकानं निरीक्षण आणि आत्मपरीक्षण करावं. निम्मे अनावश्यक संवाद आणि त्यामुळे निम्मे वाद नक्कीच कमी होतील.
२) स्त्रिया एखाद्या व्यक्तीला मैत्रीण किंवा जवळची समजतात याचा अर्थ त्यांनी परस्परांपाशी मनातल्या भावना व्यक्त कराव्यात असा असतो. स्त्रीला तिचं दु:ख जवळच्या व्यक्तीने फक्त समजून घ्यायला हवं असतं. लग्नानंतर ती त्याच भावनेने पतीला काही सांगते, तेव्हा तिला त्यावर सल्ला नको असतो. लगेच सल्ला मिळाल्याने किंवा असं वाटणंच कसं चुकीचं आहे असे ताशेरे मिळाल्याने ती जास्त दुखावते. पत्नीचं हे व्यक्त होणं फक्त थोडंसं ऐकून घ्यायला पतीने शिकायला हवं.
३) पुरुषांसाठी कर्तृत्व, यश या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. ते मित्रांशी जागतिक गप्पा मारतात, पण स्वत:च्या अडचणी सांगणं म्हणजे मैत्री किंवा जवळीक अशी त्यांची व्याख्या नसते. एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही असं वाटतं, तेव्हाच ते दुसऱ्या पुरुषाला अडचण सांगून मदत मागतात. त्यामुळे पत्नीच्या मन मोकळं करण्याला ते ती अडचण सांगतेय असं घेतात आणि एकतर सल्ला देतात किंवा ती अडचण एवढी महत्वाची नाही असं दाखवायला जातात. हे समजून घेऊन स्त्रियांनी आपलं सांगणं थोडक्यात आणि नेमकं करायला शिकायला हवं.
४) स्त्रियांकडून इतरांची विचारपूस करणं, आजारी असताना काळजी घेणं नैसर्गिकपणे घडतं. ते गृहीतच धरलं जातं. स्त्रिया आजारी असताना किंवा मासिक पाळीच्या काळात थकलेल्या असताना, त्यांना विश्रांतीची, मदतीची खरोखर गरज असते. अशा वेळी आपली गैरसोय होतेय म्हणून घरातल्यांनी, तुझं काय नेहमीचंच आहे म्हणून तिच्यावर चिडचिड करण्यानं किंवा दुर्लक्ष करण्यानं तिला काय वाटत असेल याचा अवश्य विचार करावा. ती नेहमी आपली कशी काळजी घेते ते आठवून तिच्या गरजेच्या वेळी पतीने, प्रेमाने नुसती चौकशी केली तरी तिला खूप बरं वाटतं.
५) पुरुष रागाशिवाय कुठली भावना तीव्रपणे व्यक्त करू शकत नाहीत, कारण ह्यपुरुषासारखं वागणं शिकवताना समाजानं त्यांना रडायला देखील बंदी केली आहे. आता पुरुषासारखं किंवा बायकांसारखं दोन्ही वागणं सोडून देऊन, आपण माणसासारखं वागायला शिकू या. स्त्रिया बाहेर पडल्या तशी पुरुषांची कौशल्यं शिकू लागल्या. पुरुषांनीही थोडीशी संवेदनशीलता जाणीवपूर्वक शिकावी. तर संतुलन चांगलं राहील.
६) त्याला / तिला / त्यांना असंच वाटलं असणार, म्हणून ते असं वागले असं आपण अनेकदा ठामपणे गृहीत धरून त्याप्रमाणे वागतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी गैरसमज वाढत राहतात. त्याऐवजी ती / तो / ते यांच्या मनात काय आहे? / होतं? ते त्या त्या वेळी विचारावं. त्यामुळे काल्पनिक गोष्टींना थारा रहात नाही, मनं स्वच्छ राहतात.
७) प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टीकोन असू शकतो. हत्ती आणि पाच आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाला माझाच दृष्टीकोन बरोबरह्ण म्हणजे, माझंच म्हणणं खरं असं म्हणता येऊ शकतं. त्यासाठी प्रत्येकाचा दृष्टीकोन समजून घेण्याची तयारी ठेवली तर कदाचित पूर्ण हत्ती समजून घेणं देखील शक्य होऊ शकतं. म्हणजे, नात्यांची आणखी खोलवर जाण येऊ शकते.
८). स्वत:ला नेहमी विचारण्यासाठी काही प्रश्न १. एक तत्व म्हणून व्यक्तीस्वातंत्र्य मान्य असलं, तरी आपलं म्हणणं दुसऱ्याने ऐकलं नाही, तर आपण मनात किंवा वागण्यात त्याबद्दल कशा प्रतिक्रिया देतो? २. दुसऱ्याचं म्हणणं आपण स्वत:चं म्हणणं तेवढ्यापुरतं बाजूला ठेऊन नीट ऐकून घेतो का? ३. योग्य संस्कार कोणता? मोठ्यांशी आदराने वागावे की लहान-मोठ्या प्रत्येकाचा आत्मसन्मान समजून वागावे हा? ४. आपल्याकडून जी देहबोली, बोलण्याचा टोन दुसऱ्यासाठी येत आहे, तो आपल्याला दुसऱ्याकडून मिळाला तर आपल्याला काय वाटेल? त्यावर आपण कसे वागू?