Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 02:42 PM 2021-04-21T14:42:27+5:30 2021-04-21T15:38:54+5:30
Nashik Oxygen Tank Leakage at Zakir Hussain Hospital, 22 patients die : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. नाशिक : महापालिकेच्या जुने नाशिक भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीला आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गळती झाली.
या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली.
या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय असून सुमारे दीडशे रुग्ण येथे दाखल आहेत. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत.
ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने 15 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात आले.
रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीनंतर तब्बल 2 तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली.
ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, ऑक्सिजन गळती झालेली 10 के एलची टाकी आहे. 15-20 दिवसांपूर्वीच टाकी बसविली होती. नाशिक महापालिकेने न्यू बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ठेकेदारामार्फत भाड्याच्या टाक्या बसविल्या आहेत. (सर्व फोटो- अझहर शेख)