२०२३नं भारताला दिल्या अनेक खास आठवणी; अवकाशाला गवसणी घालत संरक्षणक्षेत्रातही घेतली तेजस्वी भरारी By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 05:36 PM 2023-12-31T17:36:29+5:30 2023-12-31T17:47:43+5:30
Flashback 2023 : भारतीय संस्कृतीत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांना असाधारण महत्त्व आहे. ही पंचतत्त्वे जीवनातील महत्त्वाचे घटक असतात. २०२३ या सरत्या वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या अतुल्य कामगिरीने या पंचतत्त्वांवर आपली मुद्रा कोरली आहे.
भारतीय संस्कृतीत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांना असाधारण महत्त्व आहे. ही पंचतत्त्वे जीवनातील महत्त्वाचे घटक असतात. २०२३ या सरत्या वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या अतुल्य कामगिरीने या पंचतत्त्वांवर आपली मुद्रा कोरली आहे. चंद्रयान आणि सूर्ययानाच्या माध्यमातून भारताने अवकाशाला गवसणी घातली, तर वायूप्रमाणे सर्वांत वेगवान गतीने वाढणारी आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानावर पोहोचली. अग्नितेजाप्रमाणे संरक्षणक्षेत्रात तेजस्वी भरारी घेत भारत निर्यातदार देश ठरला. वाराणसीहून ढाका मार्गे दिब्रूगडला जाणारी गंगाविलास ही नदीतून सर्वात लांब प्रवास करणारी क्रूझ याच वर्षात लाँच झाली. जलतत्त्वाशी जोडली गेलेली ही क्रूझ पाच राज्य आणि दोन देशांमधून तब्बल ५१ दिवसांचा प्रवास करते. पृथ्वी अर्थात मातीशी जोडल्या गेलेल्या दोन घटनांमध्येही भारताने ठसा उमटवला. उत्तरकाशीतील बोगदा दुर्घटनेत ४१ कामगार अडकले होते. या कामगारांना अथक प्रयत्नांतून १७ दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, ही जगातील दुर्मीळ घटना ठरली. तर जम्मू काश्मीर पाठोपाठ राजस्थानात सापडलेल्या लिथियम साठ्यांमुळे मोठा खजिना भारताच्या हाती गवसला. या सर्व सकारात्मक घडामोडींमुळे मावळते वर्ष देशासाठी आणि आपल्यासाठी चांगल्या आठवणीही देऊन जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते संसदेच्या भव्य अशा नव्या इमारतीचे २८ मे राेजी लाेकार्पण करण्यात आले. नव्या संसद भवनात लाेकसभेचे १ हजार आणि राज्यसभेचे ४०० खासदार बसू शकतील. नवी इमारत बांधण्यासाठी सुमारे ८६२ काेटी रुपये खर्च झाले.
देशभरात २०२३ वर्षाअखेरपर्यंत एकूण ४१ वंदे भारत व २ अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला ७ वंदे भारत एक्स्प्रेस आल्या.
भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी-२० शिखर परिषदेला ऐतिहासिक यश मिळाले. परिषदेने भारताचा सन्मान वाढविला. परिषदेचा जाहिरनामा प्रथमच एकमताने मंजूर झाला. याच परिषदेत दक्षिण आफ्रिकेचा समावेश हाेऊन जी-२०चा जी-२१ असा विस्तारही झाला.
महिलांना लाेकसभा आणि राज्यसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ संसदेत २१ सप्टेंबर राेजी मंजूर झाले. त्यानंतर २९ सप्टेंबर राेजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. येत्या काळात हा कायदा लागू होणार आहे.
भारताच्या दृष्टीने चंद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरणे, हे सर्वात माेठे यश ठरले. २३ ऑगस्ट राेजी चंद्रयान-३ चंद्रावर उतरले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. त्यानंतर ‘आदित्य-एल१’ हे सूर्ययानही सूर्याची माहिती घेण्यासाठी झेपावले.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात ४१ मजूर अडकले हाेते. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. बचाव माेहिमेत अनेक अडथळे आले. मात्र, १७ दिवसांनी अखेर त्यांना २८ नाेव्हेंबर राेजी सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचाव माेहिमेचे हे एक माेठे यश हाेते.
शस्त्रास्त्रांचा सर्वात माेठा आयातदार असलेला भारत आता संरक्षण क्षेत्रातील निर्यातदार बनताेय. देशाने २०२२-२३ मध्ये १५,९२० कोटींची विक्रमी निर्यात केली.
जम्मू-काश्मीर, तसेच राजस्थानमध्ये लिथियम या धातूचे माेठे साठे सापडले. देशाची ८० टक्के गरज या साठ्यातून पूर्ण हाेऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘गंगा विलास क्रूझ’ला हिरवा झेंडा दाखविला. ही जगातील सर्वात माेठी रिव्हर क्रूझ आहे. वाराणसी ते दिब्रुगडपर्यंत तब्बल ३,२०० किलाेमीटरची सफर ही आलिशान क्रूझ घडविणार आहे.
यावर्षी संसदेत ३० महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. त्यात नवे फाैजदारी संहिता, दूरसंचार विधेयक, जम्मू आणि काश्मीर आरक्षण विधेयक, पाेस्ट ऑफिस विधेयक, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील विधेयकांचा त्यात समावेश आहे.
भारताची लाेकसंख्या १४३ काेटींपेक्षा जास्त झाली आणि जगातील सर्वाधिक लाेकसंख्या असलेला देश भारत ठरला.
भारताची अर्थव्यवस्था २०२३ मध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेचेही यावर शिक्कामाेर्तब.
सुरत या शहरात ‘सुरत डायमंड बाेर्स’ ही जगातील सर्वात मोठी व्यापारी इमारत सुरू झाली.