वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने 2138 जणांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 01:50 PM2017-09-08T13:50:49+5:302017-09-08T13:56:58+5:30

गेल्या वर्षभरात वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने देशभरात २१३८ लोकांना जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा अपघातांत केवळ वाहनचालकच नव्हे, तर रस्त्यांवरून चालणा-यांचाही मृत्यू झाला आहे.

याशिवाय चुकीच्या पद्धतीचे स्पीडब्रेकर्स, रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची अर्धवट व दर्जाहीन बांधकामे यांमुळे होणा-या अपघातांमध्ये रोज २६ लोकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सर्व राज्यांकडून माहिती मागवून अपघातांसंबंधीचा एक अहवाल तयार केला आहे.

मोबाइलचा वापर करताना झालेल्या अपघातांत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोक मरण पावल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातील १७२ जणांनीही मोबाइलवर बोलताना जीव गमावला.

अहवालानुसार, देशात प्रत्येक तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो. वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलचा वापर यामागे मुख्य कारण आहे. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्यांवरुन चालणारे लोकही चालताना मोबाइलचा वापर केल्याने अपघाताला बळी पडले आहेत.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे की, 'वाहन चालवताना मोबाइल फोनवर गप्पा मारणे तसंच सेल्फी घेण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे बेजबाबदार वागणा-यांच्या जिवाला धोका असतोच, मात्र ते इतरांसाठीही धोका ठरु शकतात'.