४०० खोल्या, ५६० किलो सोनं, असा आहे ज्योतिरादित्य शिंदे यांचा ४ हजार कोटींचा शाही पॅलेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:24 AM2022-05-24T11:24:38+5:302022-05-24T11:31:01+5:30

१९ व्या शतकातील हा महाल त्यांच्या लक्झरी आणि आधुनिक विचारसरणीचे उदाहरण आहे.

४०० खोल्या, ५६० किलो सोनं, असा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा जयविलास पॅलेस आहे. जयविलास पॅलेस श्रीमंत जयाजी राव शिंदे यांनी १८७४ मध्ये तयार केला होता. हा पूर्ण महाल ४० एकर परिसरात बनवलेला आहे.

१९ व्या शतकातील हा महाल त्यांच्या लक्झरी आणि आधुनिक विचारसरणीचे उदाहरण आहे. पारंपारिक डिझाइनच्या पलीकडे जाऊन संपूर्ण महाल युरोपियन शैलीतील स्थापत्यशास्त्रात बांधण्यात आला आहे, जो टस्कन, इटालियन आणि कोरिंथियन शैलींनी प्रेरित आहे.

या महालाचे वास्तुविशारद मायकल फिलोस होते, त्यांनी दरबार हॉलची रचना अतिशय अनोख्या पद्धतीने केली होती. १२,४०,७७१ चौरस फूटांमध्ये पसरलेल्या या महालात तीन मजले आहेत आणि आजही ते शिंदे कुटुंबाचे निवासस्थान आहे.

हा जयविलास पॅलेस जयाजीराव शिंदे यांच्याकडून त्यांचे नातू ज्योतिरादित्य शिंदे यांना वारस्यानं मिळाला आहे. ते सध्या राजकारणात सक्रिय असून त्यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी आहे. प्रिन्स जॉर्ज आणि वेल्सच्या राजकुमारी मॅरी यांच्या स्वागतासाठी या महालाची निर्मिती करण्यात आल्याचं म्हटलं जाते. ते १८७६ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.

महाराजा जयाजी राव शिंदे यांच्या देखरेखीखाली १८७४ मध्ये राजवाड्याचा पाया घातला गेला. ब्रिटीश लेफ्टनंट कर्नल सर मायकल फिलोस यांनी महालाची रचना केली होती. त्यावेळी या महालाची किंमत १ कोटी रुपये होती आणि आज त्याची किंमत ४ हजार कोटींहून अधिक आहे.

विशेष म्हणजे महालाचा प्रत्येक मजला वेगळ्या थीमने डिझाइन करण्यात आला आहे. महालाचा पहिला मजला टस्कन, दुसरा इटालियन-डोरिक आणि तिसरा कोरिंथियन आणि पॅलेडियन डिझाइन्सने प्रेरित आहे. त्या वेळी दरबार हॉलच्या छतावरून आठ हत्तींना नेण्यात आलं होतं. दोन मोठ्या झुंबरांचं वजन पेलण्यासाठी छत सक्षम आहे का नाही हे पाण्यासाठी असं करण्यात आलं.

हॉलचं इंटिरिअर ५६० किलो सोन्यानं सजवण्यात आलं आहे. याच ठिकाणी राजे बैठकांना उपस्थित राहत होते. हॉलचं डिझाईन नियोक्लासिकल आणि बारेक शैलींनी प्रभावित आहे.

याशिवाय या ठिकाणी एक चांदीनं तयार कलेली एक मॉडेल ट्रेन आहे. ही ट्रेन बॅन्क्वेट हॉलमध्ये खाण्याच्या टेबलावर एका ट्रॅकवर चालत असेल. याचा वापर आलेल्या पाहुण्यांना ब्रँडी आणि सिगार सर्व्ह करण्यासाठी केला जात होता.

या महालात एकूण ४०० खोल्या आहेत. यापैकी ३५ खोल्या आता संग्रहालयामध्ये बदलण्यात आल्या आहेत. एचएच महाराजा जयाजीराव शिंदे संग्रहालयाला राजमाता विजयाराजे शिंदे यांनी जयाजीराव शिंदे यांच्या आठवणीत तयार केले होते. या महालात चांदीचे रथ, पालखी, जुन्या लक्झरी कार्सचा संग्रह आहे. संग्रहालयात नेपोलियन, टीपू सुल्तानच्या लिथोग्राफसाख्या भारतीय आणि युरोपिय कलाकारांच्या दुर्मिळ चित्रांचा समावेश आहे.