महिनाभरात ७ हल्ले, १२ जवानांना हौतात्म्य, जम्मूमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांनी वाढवली चिंता By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 01:01 PM 2024-07-16T13:01:21+5:30 2024-07-16T13:10:04+5:30
Terror Attacks In Jammu: मागच्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपला मोर्चा काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूकडे वळवल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. मागच्या एका महिन्यामध्ये जम्मूमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ९ जून रोजी जम्मूमधील रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये ९ प्रवासांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ८ जुलै रोजी कथुआ येथे लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. त्यात ५ जवानांना वीरमरण आलं होतं. मागच्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपला मोर्चा काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूकडे वळवल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. मागच्या एका महिन्यामध्ये जम्मूमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ९ जून रोजी जम्मूमधील रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये ९ प्रवासांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ८ जुलै रोजी कथुआ येथे लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून हल्ला केला. त्यात ५ जवानांना वीरमरण आलं होतं.
नौशेरा येथे १० जुलै रोजी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र तो लष्कराने हाणून पाडला होता. मात्र आज १६ जुलै रोजी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ४ जवानांना हौतात्म्य आलं. मागच्या एका महिन्यामध्ये दहशकवाद्यांनी ७ मोठे हल्ले केले असून, त्यामध्ये १२ जवानांना वीरमरण आलं आहे. मागच्या महिनाभरात झालेले मोठे दहशतवादी हल्ले पुढीलप्रमाणे
रियासी बस हल्ला कटरा येथील रियासी परिसरात यात्रेकरूंना वैष्णोदेवी मंदिरात घेऊन जात असलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर बस दरीत कोसळली. यामध्ये ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. तर इतर ४१ जण जखमी झाले होते.
कथुआ हल्ला ११ जून रोजी जम्मूमधील कथुआ येथील एका गावात दहशतवादी घुसले होते. त्यांनंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. तर या चकमकीत सीआरपीएफच्या एका जवानाला वीरमरण आलं होतं.
डोडा येथील दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामधील तात्पुरत्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी १२ जून रोजी गोळीबार केला होता. त्यात दोन जवान जखमी झाले होते. तर नंतर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या चकमकीदरम्यान, एक नागरिकही जखमी झाला होता.
कुलगाम येथे चकमक, दोन जवानांना हौतात्म जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील दोन गावांमध्ये ६ जुलै रोजी झालेल्या चकमकीत दोन जवानांना हौतात्म्य आलं होतं. यामधील एक चकमक कुलगाममधील चिनीगाम तर दुसरी चकमक ही मोदरगाम येथे झाली होती.
कथुआमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला जम्मू काश्मीरमधील कथुआ येथे ८ जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये पाच जवानांना वीरमरण आलं होतं. दबा धरून असलेल्या दहशतवाद्यांनी संध्याकाळच्या वेळी हा हल्ला केला होता. त्यादरम्यान, दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले. तसेच अंदाधुंद गोळीबार केला.
नौशेरा येथे घुसखोरीचा प्रयत्न राजौरीमधील नौशेरा सेक्टरमध्ये १० जुलै रोजी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. दहशतवाद्यांच्या एका गटाने भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र हा हल्ला भारतीय लष्कराने हाणून पाडला होता.
राजौरी येथे लष्कराच्या तळावर हल्ला जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे ७ जुलै रोजी लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. मात्र तिथे पहाऱ्यावर असलेल्या जवानांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला होता.