7 new corridors would be explore for bullet train operations by nhsrcl
एक-दोन नव्हे, सात मार्गांवर बुलेट ट्रेन धावणार?; मोदी सरकारची तयारी जोरात By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:34 PM2020-09-03T16:34:40+5:302020-09-03T16:38:51+5:30Join usJoin usNext मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरनंतर आता मोदी सरकारनं आणखी सात नव्या कॉरिडॉरसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचएसआरसीएल) प्रस्ताव दिला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ किलोमीटर लांबीचा आहे. तर नव्या सात कॉरिडॉरच्या माध्यमातून ५ हजार किलोमीटरवर बुलेट ट्रेन धावेल. प्रस्तावित सात नव्या मार्गांचा आढावा घेण्याचं काम रेल्वे मंत्रालयानं एका एजन्सीला सोपवल्याची माहिती एनएचएसआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे मंत्रालयानं एनएचएसआरसीएलला दिलेल्या सात बुलेट मार्गिकांची माहिती आकडेवारीसह एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितली. दिल्ली-वाराणसी (८६५ किलोमीटर), मुंबई-नागपूर (७५३ किलोमीटर), दिल्ली-अहमदाबाद (८८६ किलोमीटर), चेन्नई-म्हैसूर (४३५ किलोमीटर), दिल्ली-अमृतसर (४५९ किलोमीटर), मुंबई-हैदराबाद (७११ किलोमीटर) आणि वाराणसी-हावडा (७६० किलोमीटर) या मार्गांवर बुलेट ट्रेन चालवण्यात येतील. बुलेट ट्रेनच्या सात मार्गिकांसाठी विस्तृत अहवाल तयार करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. सात नव्या मार्गांवर बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यासाठी एनएचएसआरसीएलनं त्या भागांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एनएचएसआरसीएलकडून सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हाय स्पीड योजनेवर काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो अबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १७ अब्ज डॉलरचा खर्च येणार आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील हाय स्पीड योजनेसाठी जपान आंतरराष्ट्रीय सहाय्य संस्था (जेआयसीए) आणि रेल्वे मंत्रालयानं सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पासाठी एकूण १ हजार ३८० हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी ५९८ हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. पैकी ४७९ हेक्टर जमीन जमीन मालकांकडून, तर ११९ हेक्टर सरकारकडून ताब्यात घेण्यात आली आहे.टॅग्स :बुलेट ट्रेननरेंद्र डोंगरBullet TrainNarendra hill