Aadhar Card Update: सावधान! आधार कार्डचा ‘पीओआय’, ‘पीओए’ अपडेट करा, अन्यथा मोठे नुकसान होणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 12:44 PM 2022-12-12T12:44:37+5:30 2022-12-12T12:50:26+5:30
आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अद्ययावत करता येते. ऑनलाइनसाठी २५ रु., तर ऑफलाइनसाठी ५० रु. शुल्क लागते. आधार कार्ड अद्ययावत न केल्यास सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय) दिला आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डमध्ये ‘पीओआय’ आणि ‘पीओए’संबंधी तपशील नेहमी अद्ययावत असायला हवा, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
आधार कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अद्ययावत करता येते. ऑनलाइनसाठी २५ रु., तर ऑफलाइनसाठी ५० रु. शुल्क लागते.
काय आहे पीओआय व पीओए? पीओआय म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी. यात आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो. पीओए म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस. यात पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात.
ओळखीसाठी कोणते पुरावे हवेत? आधार प्राधिकरणाने १ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, पीओआय म्हणजेच ओळखीच्या पुराव्यासाठी फोटो असलेली कागदपत्रे आवश्यक आहेत. यात पॅन कार्ड, ई-पॅन, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, शस्त्र परवाना, फोटो बँक एटीएम कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, विवाह प्रमाणपत्र, किसान फोटो पासबुक, इत्यादी कागदपत्रे चालू शकतात.
पीओएसाठी कोणते पुरावे हवेत? पीओए म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेला दस्तऐवज आवश्यक आहे. यात पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पेन्शनर कार्ड, किसान पासबुक, अपंगत्व कार्ड, मनरेगा कार्ड, शाळेचे वैध ओळखपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, वीज बिल, पाणी बिल, लँडलाईन फोन बिल, पोस्टपेड मोबाइल बिल यांचा समावेश आहे.
असा करता येईल बदल आधार कार्डातील सर्व माहिती अद्ययावत करता येते. नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, भाषा यांतील बदल ऑनलाइन शक्य आहे. त्यासाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा. यासाठीचे शुल्क २५ रुपये आहे. फोटो आणि मोबाइल क्रमांक ऑफलाइन अद्ययावत करता येईल. त्यासाठीचे शुल्क ५० रुपये आहे.
हे महत्वाचे आधार कार्डमध्ये नाव दोन वेळा बदलता येते. जन्मतारीख केवळ एकदाच बदलू शकता. त्यातही तीन वर्षांचाच फरक ग्राह्य धरला जाईल.
लिंगबदलही केवळ एकदाच शक्य आहे. ही मर्यादा ओलांडल्यानंतरही बदल करायचा असल्यास यूआयडीएआयच्या विभागीय कार्यालयात पुराव्यांसह भेट द्या.