Narendra Modi: आपनेही तीच चूक केली! २००७, २०१७ अन् आता २०२२; गुजरात निवडणुकीपूर्वी मोदींना अपशब्द वापरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:12 PM2022-10-11T13:12:13+5:302022-10-11T13:21:12+5:30

Gopal Italia Comment on Narendra Modi: जुन्या व्हिडीओचे आताच भांडवल करण्यात येऊ लागले आहे. गुजरातमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांसाठी आपल्या होम ग्राऊंडवर दाखल झाले आहेत. गुजरातची जनता मोदींना खूप पाठिंबा देते. परंतू, मोदींना विरोध करणारे देखील आहेत. अशातच केजरिवालांची आप गुजरातमध्ये मोठी ताकद लावू लागली आहे. अशातच आपने एक मोठी चूक केली आहे. ती त्यांना चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे.

आपने पंजाबमध्ये जिंकल्यानंतर त्या खालचे राज्य गुजरातकडे लक्ष केंद्रीत केले आहेत. गुजरातची निवडणूक आपला सत्तेत नाही परंतू चांगले यश मिळवून देण्याची शक्यता आहे. असे असताना आपच्या एका नेत्याने जी चूक काँग्रेसने केली तीच केली आहे. गुजरात आपचे अध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी मोदींसाठी अपशब्द वापरले आहेत. भाजपाने याचेच अस्त्र आपविरोधात वापरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

जेव्हा जेव्हा मोदींवर अपशब्दांचा मारा झाला तेव्हा तेव्हा भाजपाने त्याचा वापर करून गुजरात निवडणुका जिंकल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील मोदींना अपशब्द वापरले होते. यानंतर काँग्रेसला गुजरातमध्ये मोठे नुकसान झाले होते. २०१७ मध्ये जेव्हा गुजरातमध्ये निवडणूक होती, तेव्हाच अय्यर यांनी वक्तव्य केले होते. असाच प्रकार २००७ मध्येही घडला होता. 2017 मध्ये मीडियाशी बोलताना मणिशंकर अय्यर यांनी पीएम मोदींसाठी 'नीच किस्म का आदमी' हा शब्द वापरला होता.

२००७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गुजरातमध्ये प्रचार करत होत्या. डिसेंबरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना 'मौत का सौदागर' म्हटले होते. गुजरात दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांची सहानुभूती पक्षाला मिळेल, असे काँग्रेस पक्षाला वाटत होते. परंतू त्याचे परिणाम उलट झाले. भाजपला 117 तर काँग्रेसला केवळ 59 जागा मिळाल्या होत्या.

भारतीय जनता पक्षाने (भाजप) आम आदमी पार्टीच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये गोपाल इटालिया पंतप्रधान मोदींना 'नीच आदमी' म्हणताना ऐकू येत आहेत. हा व्हिडिओ 2019 चा असून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा आहे. परंतू त्याचा वापर आता केला जात आहे.

जुन्या व्हिडीओचे आताच भांडवल करण्यात येऊ लागले आहे. हा भारताच्या लोकशाही प्रक्रियेचा अपमान असल्याचे संबित पात्रा म्हणाले. पंतप्रधान हे गुजरातचे असून त्यांच्याविरोधात अशी भाषा वापरणे हे गुजरातच्या विरोधात आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतरच्या परिणामांना काँग्रेसप्रमाणेच आम आदमी पक्षालाही सामोरे जावे लागेल, याची आठवणही पात्रा यांनी करून दिली. मणिशंकर अय्यर यांच्या भाषेचा परिणाम म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. संपूर्ण देशात काँग्रेसची अवस्था सर्वांनी पाहिली आहे, असा इशाराही दिला आहे.