ऑनलाइन लोकमत - रांची, दि. 09 - चोरी झाल्याच्या घटना नेहमी कानावर पडत असतात त्यामुळे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण रेल्वे स्टेशन चोरी झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकली आहे का ? तुमचा विश्वास बसणार नाही पण झारखंडमध्ये संपुर्ण रेल्वे स्टेशनच चोरीला गेलं आहे. धनाबाद - झारिया - सिंधी मार्गावरील रेल्वे स्टेशन चोरीला गेलं आहे. चोरांनी केलेल्या चोरीमुळे याठिकाणी रेल्वे स्टेशन नक्की होतं का ? असा प्रश्नच पडला आहे. चोरांनी फक्त रेल्वे स्टेशन नाही तर रेल्वे ट्रॅकही चोरले आहेत. तर काहींनी चक्क केबिनच चोरुन नेल्या आहेत. रेल्वे कार्यालय आता कोंबड्यांचं घर झालं आहे आणि ट्रॅकवर तर चक्क शेती करायला सुरुवात झाली आहे. या मार्गावरुन अगोदर ट्रेन जायच्या, मात्र 10 वर्षापुर्वी हा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यानंतर या रेल्वे स्टेशनवर चोरीच्या घटना होऊ लागल्या. रेल्वे अधिकारी असो वा प्रशासन कोणालाच याची काही काही चिंता नसल्याचं दिसत आहे. रेल्वे स्टेशनवर कोणत्याच प्रकारची सुरक्षा नसल्याने लोकांनी फायदा घेण्यास सुरुवात केली आणि रेल्वेची संपत्ती लुटली. थोड्याच कालावधीत संपुर्ण रेल्वे स्टेशनचीच चोरी करुन टाकले. रेल्वेच्या कोटींच्या संपत्तीची अत्यंत सहजतेने चोरी करुन विकण्यात आली. रेल्वेचे खांब, गेट, सिग्नल लाईट, महागडी साधनसामुग्री लुटण्यात आली आणि कवडीमोलाच्या भावात विकण्यात आली. रेल्वे स्टेशनवरील संपत्तीची किंमत 50 कोटींच्या घरात आहे. मात्र सध्या हे रेल्वे स्टेशन पुर्णपणे निर्जन झालं आहे.