जया बच्चन यांचे पूर्ण नाव नक्की काय? सरकारी कागदपत्रांवरून तीन वेगळे उल्लेख By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:17 PM 2024-08-09T18:17:38+5:30 2024-08-09T18:40:04+5:30
खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत पुन्हा जोरदार एकदा वाद झाला. जया बच्चन यांचे नाव आणि जगदीप धनखड यांच्या बोलण्याचा टोन हे या वादाचं कारण होतं. सभापती जगदीप धनखड यांनी जया यांना 'जया अमिताभ बच्चन' म्हणण्याचा राग आला होता. मात्र, त्यांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २९ जुलै आणि ५ ऑगस्टलाही त्यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली होती.
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण यांना नावावरुन सुनावल्याने हा सगळा वाद सुरु झाला. जया बच्चन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हरिवंश नारायण यांनी जया बच्चन यांना आठवण करुन दिली की अधिकृतपणे त्यांचे मधले नाव अमिताभ आहे आणि ते याचे पालन करतील.
यावर स्त्रियांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जाण्याचा हा एक नवीन प्रकार आहे का? असा सवाल जया बच्चन यांनी केला होता. त्यानंतर सभापती धनखड यांनीही तसाच उल्लेख केल्याने दोघांमध्ये खडाजंगी सुरु झाली.
जया बच्चन यांच्या नावावरुन हा वाद सुरु असताना याबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. लल्लनटॉपच्या वृत्तानुसार, जया बच्चन यांनी तीन वेगवेगळ्या नावांचा वापर केल्याचे समोर आलं आहे.
तीन सरकारी कागदपत्रांनुसार जया बच्चन यांचे नाव वेगवेगळ्या पद्धतीने लिहीले गेले आहे. पहिला-२००६ मध्ये त्यांना राज्यसभेतून अपात्र ठरवण्याचा आदेश. दुसरे- २०१२ च्या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र. तिसरे- २०१८ च्या राज्यसभा निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र
२०१८ साली पुन्हा जया बच्चन यांनी समजावादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी प्रतिज्ञापत्रात त्यांचे नाव जया अमिताभ बच्चन असं लिहीण्यात आलं होतं.
त्यानंतर २०१२ साली पुन्हा जया बच्चन यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. त्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे नाव बच्चन जया अमिताभ असं लिहीण्यात आलं होतं.
२००६ मध्ये राज्यसभा खासदार झाल्यानंतर जया उत्तर प्रदेश चित्रपट विकास महामंडळाच्या अध्यक्षा होत्या. मार्च २००६ मध्ये निवडणूक आयोगाची शिफारस मान्य करण्यात आली आणि त्यांना खासदारकी गमवावी लागली. कायदा आणि न्याय मंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी ज्यामध्ये जया बच्चन यांचे नाव श्रीमती जया बच्चन असे होते.
त्यामुळे या कागदपत्रांवरून त्या दोन्ही प्रकारे नाव लिहीत आल्याचे समोर झाले आहे. पण त्यांच्या नावासोबत ‘अमिताभ’ जोडून हाक मारणे त्यांना आवडत नाही.