Afghanistan Taliban Crisis: काश्मीरबाबत तालिबाननं स्पष्टच सांगितलं; पंतप्रधानांच्या घरी उच्चस्तरीय बैठक, सैन्य अलर्टवर By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:52 PM 2021-08-17T19:52:32+5:30 2021-08-17T20:00:36+5:30
Taliban on Jammu Kashmir: तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर आता चीन, पाकिस्तान, बांग्लादेशाने तालिबानी सत्तेला मान्यता दिली आहे. मात्र अद्याप भारताने भूमिका स्पष्ट केली नाही. एकीकडे भारत १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यता दिवस साजरा करत होता तर दुसरीकडे अफगाणिस्तानात तालिबाननं कब्जा मिळवला. राजधानी काबुलवर कब्जा मिळवत तालिबानने संसद आणि राष्ट्रपती भवन हाती घेतलं. तालिबानी कृत्यामुळे अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून सुरक्षित स्थळी जात आहेत.
अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर भारताच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशाने तालिबानच्या सत्तेला मान्यता दिली आहे. तर अफगाणिस्तान प्रकरणावर काय भूमिका घ्यावी यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु आहे.
त्यात तालिबानने काश्मीरवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीर द्विपक्षीय आणि भारत-पाकचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे काश्मीरवर आमचं लक्ष नाही असं तालिबानने स्पष्ट केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काश्मीरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
भारत सध्या वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहे. सरकारची स्थापना कशी आणि केव्हा होईल आणि लोकांप्रती तालिबानी शासनाचा व्यवहार कसा असेल यावर भारताची नजर आहे. त्याचसोबत अन्य लोकशाही देश तालिबान शासनावर काय भूमिका घेतात हेदेखील भारत पाहत आहे.
त्याचसोबत भारताला चिंता आहे की, अफगाणिस्तान इस्लामिक दहशतवादांचे पहिले केंद्र बनू शकते. पाकिस्तानची आयएसआय संस्था तालिबानला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू शकेल असं भारताला वाटतं. परंतु त्याचा प्रभाव मर्यादित आहे. तालिबानने ताकदीवर सत्ता मिळवली आहे.
ISI केवळ कमकुवत तालिबानींना प्रभावित करू शकतं. परंतु सध्याच्या स्थितीत याची शक्यता फार कमी आहे असं भारतीय अधिकाऱ्यांना वाटतं. भूतकाळात अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे कॅम्प होते. त्यामुळे जम्मू काश्मीरबाबत सावधान राहावं लागेल असं सूत्रांनी सांगितले.
तसेच पाकिस्तान पूर्णपणे तालिबानला काश्मीरविरोधात भडकवण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यासाठी भारताला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी अलर्ट राहायला हवं असं भारतीय उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सूत्रांनी माहिती दिली आहे.
लष्कर ए तोयबा, लश्कर ए झांगवीसारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात उपस्थित आहेत. त्यांनी तालिबानसोबत मिळून काबुलच्या काही गावात आणि भागांमध्ये चेक पोस्ट बनवल्या असल्याची माहितीही समोर आली आहे.
काश्मीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात येत असली तरी सध्या सर्वकाही नियंत्रणात आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान काही संघटनांना हाताशी धरुन वेळेची संधी घेण्याची शक्यता फार कमी आहे. कारण सध्या त्यांची क्षमता इतकी जास्त नाही असं भारताला वाटतं. तरीही भारत या सर्व गोष्टींचा विचार करत आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या एका चॅनेलशी बोलताना तालिबानी नेत्याने अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसऱ्या देशांविरोधात करणार नाही असं आश्वासन दिले आहे. भारताने त्यांच्या योजना पूर्ण करायल्या हव्यात. तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले की, कुठल्याही देशाविरोधात अफगाणिस्तानची जमिन वापरू देणार नाही. भारताने अफगाणिस्तानात त्यांच्या अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करावेत असं तालिबानने सांगितले आहे.
भारताने अफगाणिस्तानात बरीच गुंतवणूक केली आहे. परंतु त्यांनी तालिबानी सत्तेला मान्यता दिली नाही. परंतु आता परिस्थिती बदलली आहे असा प्रश्न तालिबानला विचारला होता. त्यावर आम्ही यापूर्वीच सांगितले आहे कुठल्याही देशाविरुद्ध आमच्या अफगाणिस्तानचा वापर केला जाणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरं. जर भारत अफगाणिस्तानात विकासाचे प्रकल्प बनवत असेल, निर्माण करत असेल तर त्यांनी ते करावे कारण ते जनतेसाठी आहेत. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन म्हणाले की, परंतु कुणीही अफगाणिस्तानची जमीन स्वत:च्या फायद्यासाठी, त्यांच्या देशाच्या स्वार्थासाठी वापरत असेल तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही असंही तालिबाने म्हटलं आहे.