Covid Vaccination: मोठ्या थाटात लस टोचली; दुसऱ्याच दिवशी चाचणीत नर्स कोरोना पॉझिटिव्ह निघाली

By प्रविण मरगळे | Published: January 20, 2021 02:18 PM2021-01-20T14:18:32+5:302021-01-20T14:22:37+5:30

गेल्या वर्षभरात कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले, यातील लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला, कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी जगातील बहुसंख्य देशांनी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला, तर कोरोना संपुष्टात येण्यासाठी संशोधकांनी दिवसरात्र मेहनत घेतली.

वैज्ञानिकांच्या मेहनतीला यश आलं, अनेक देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे, भारतातही १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

इतर देशांनाही भारत कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे, याची सुरुवात भारताचा शेजारील देश असलेल्या बांगलादेशपासून होणार आहे. भारत बुधवारी बांगलादेशला २० लाख लसींचे डोस पाठवणार आहे. हे डोस सीरम इन्स्टिट्युटने उत्पादन केलेल्या कोविशिल्डचे असतील. मिळालेल्या माहितीनुसार भारत हे डोस सद्भावना म्हणून पाठवणार आहे.

दरम्यान, लसीकरणासाठी सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. लस घेतल्यापासून आतापर्यंत ५४१ लोकांना त्याचे दुष्परिणाम झाले आहेत.

लसीकरणाचे साइड इफेक्ट पाहता सीरमनं आणि भारत बायोटेकने मार्गदर्शिक सूचना काढत कोणी ही लस घेऊ नये याबाबत सूचना केली आहे. आपल्याला कोणतीही औषधे, खाद्यपदार्थाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एलर्जी असल्यास कोविशिल्ड अजिबात टोचू नका. आपल्याला ताप किंवा सर्दी असल्यास लस घेऊ नका असं बजावण्यात आलं आहे.

जर एखादी महिला गर्भवती असेल किंवा मुलं होण्याचं प्लॅनिंग करत असेल, स्तनपान देणाऱ्या आईनेही कोविशिल्ड लसीचा डोस घेऊ नये, जर आपण कोविड विरूद्ध लस आधीच घेतली असेल तर आपल्याला कोविशिल्ड टोचण्याची गरज नाही असं सांगण्यात आलं आहे.

कोरोना लसीकरण आल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर दुसरीकडे लस घेऊन आलेल्या अनेकांमध्ये लसीचे दुष्परिणाम समोर आले आहेत. विविध लोकांवर कोरोना लसीचे परिणाम जाणवू लागले आहेत.

मध्य प्रदेशातील मंडला येथे कोरोना लसीकरण दिल्यानंतर नर्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रिपोर्ट येण्याच्या एक दिवस आधीच नर्सचं कोरोनाची लस टोचली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे.

नर्स जिल्हा हॉस्पिटलमध्ये कामाला होती, काही दिवसांपूर्वी नर्सची तब्येत ढासळली होती, सर्दी आणि तापाची समस्या झाल्याने नर्सने कोरोना चाचणी केली, या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं आहे.

नर्सला कोरोनाची लस टोचण्यात आली होती, तब्येत बिघडली असल्याने तिची चाचणी करण्यात आली होती, ज्या दिवशी कोरोना लस टोचली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा अहवाल आला, यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं अशी माहिती हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर विजय मिश्रा यांनी सांगितले.

डॉक्टर विजय मिश्रा म्हणाले की, जिल्हा हॉस्पिटलमधील एका नर्सला कोरोनाची लस देण्यात आली होती, तिची तब्येत बरी झाली नाही. म्हणून चाचणी केली तेव्हा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, आता नर्सला फक्त १ डोस दिला आहे, प्रतिकारशक्ती विकसित झाल्यानंतर दुसरा डोस दिला जाईल.