भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 09:29 PM2020-06-27T21:29:08+5:302020-06-27T22:00:46+5:30

भारत-चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढत असतानाच, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी चीनचा सामना करण्यासाठी सैन्य तैनातीत वाढ करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य येताच चीनला घाम फुटला आहे. चीनचा सूर बदलू लागला आहे.

आता, हिंद-प्रशांत महासागरात भारत आणि अमेरिका एकत्र आले, तर अवघड होईल, अशी भीती चीनला सतावू लागली आहे. यामुळे चीनचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने आता भारताची 'तारीफ' करायला सुरुवात केली आहे. त्याचे म्हणणे आहे, की भारत अमेरिकेसोबत राहणार नाही. कारण त्याला राजकीय स्वतंत्र्य पसंत आहे.

अमेरिकेच्या या ताज्या वक्तव्यानंतर, लडाखमध्ये भारतासमोर उभ्या ठाकलेल्या चीनला, आता भारत आणि अमेरिका त्याच्या विरोधात एकत्र येतात की काय, अशी भीती सतावू लागली आहे. चीनची ही भीती फायनांशिअल टाइम्सचे एक स्तंभलेखक गिडोन रॅचमॅन यांनीही वाढवली आहे.

त्यांनी लिहिले आहे, भारताने नव्या शीत युद्धासाठी एक पक्ष निवडला आहे. आपल्या प्रतिस्पर्ध्याला अमेरिकेच्या बाजूने जाऊ देणे, हा चीनचा मूर्खपणा आहे. या वक्तव्याने चीनचा तीळपापड उडाला आहे. अमेरिकेच्या एका चालीने संपूर्ण समिकरणच आपल्या विरोधात जात आहे, याची अनुभूती आता त्याला होऊ लागली आहे. त्यांचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्स मात्र, हा युक्तीवाद फेटाळून लावण्या मागे लागले आहे.

ग्लोबल टाइम्सने लिहिले आहे, की एक वेळ होती, भारत-चीनदरम्यानचा तणाव एक मोठा धोका होता. भारत तेव्हाही कुठल्याही देशावर अवलंबून नव्हता. यामुळे हा तर्कही चुकीचा आहे, की सध्याच्या सीमेवरील तणावपूर्ण स्थितीतही भारत कुण्या एका गटाकडे जाईल.

भारत आणि अमेरिका कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊ नयेत, असा चीनचा प्रयत्न आहे. भारत आणि अमेरिका एकत्र आले, तर दक्षिण आशिया आणि हिंद-प्रशांत भागात अत्यंत वाईट पद्धतीने आपण घेरले जाऊ, याची पूर्ण जाणीव चीनला आहे.

चीनला भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीची भीती एवढी सतावत आहे, की त्यात दरी निर्माण करण्यासाठी चीन वारंवार रशियाचा उल्लेख करत आहे. चीनमधील सरकारी मुखपत्राने लिहिले आहे, की भारताने रशियासोबत शस्त्र खरेदीचा सौदा करून त्याच्या मनात अमेरिकेचे किती महत्व आहे, हे अमेरिकेला दाखवून दिले आहे.

एवढेच नाही, तर भारत आणि अमेरिका केवळ एकमेकांचा उपयोग करतात. पाकिस्तानवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत अमेरिकेसोबत जवळीक वाढवतो. तर, दुसरीकडे अमेरिका हिंद-प्रशांत भागात चीनला शह देण्यासाठी भारताचा वापर करतो, असेही या मुखपत्राने म्हटले आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी बेचैन असलेल्या चीनच्या सरकारी मुखपत्राने असेही लिहिले आहे, की 'भारतला चांगलेच माहीत आहे, की त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी अमेरिका त्यांची मदत करणार नाही.'

चीनला आता असुरक्षिततेची जाणीव होऊ लागली आहे. एकीकडे भारताने रशियासोबत शस्त्रास्त्र खरेदीचा सौदा करून चीनच्या चिंतेत भर टाकली आहे, तर दुसरीकडे भारतासह आपल्या मित्र राष्ट्रांच्या समर्थनार्थ अमेरिकेने केलेल्या घोषनेने त्याची झोप उडवली आहे.