Cyclone Amphan : तो येतोय..., चक्रीवादळाची चाहूल लागल्यानं घाबरलंय ओडिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 01:24 PM2020-05-20T13:24:41+5:302020-05-20T13:55:06+5:30

Cyclone Amphan : या वादळामुळे समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. किनारी जिल्ह्यांकडे हे वादळ ताशी 155 ते 165 किमीपर्यंत वेगानं सरकत आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या शक्तिशाली चक्रीवादळ 'अम्फान'ने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम ओडिशाच्या किनारपट्टी भागात मंगळवारी रात्रीपासून दिसू लागला आहे.

किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत आहेत. बालासोर, भद्रक या जिल्ह्यांत वृक्ष उन्मळून पडण्याची नोंद आहे. भद्रक आणि पारादीप येथे मुसळधार पाऊस पडत आहे.

नदीकाठच्या 10 हजार लोकांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे. कच्च्या घरात राहणा-या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मच्छिमारांना समुद्रापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

संपूर्ण ओडिशामध्ये किनारपट्टी भागातील सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे.

त्याचवेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, चक्रीवादळ सकाळी 10.30 वाजता पारादीपपासून 120 किमी अंतरावर होते.

हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल-बांगलादेशच्या किनारपट्टीवरून जाण्याचा अंदाज आहे. आज दुपारपासून या चक्रीवादळाचा प्रभाव दिसण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. ओडिशा किना-यावरील भागात चक्रीवादळाचा मोठा धोका आहे.

मंगळवारपासून समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. किनारी जिल्ह्यांकडे हे वादळ ताशी 155 ते 165 किमीपर्यंत वेगानं सरकत आहे. जास्तीत जास्त वा-याचा वेग देखील 185 किमी प्रतितास असू शकतो.

जोरदार वा-यामुळे ओडिशाच्या चांदबली येथे महामार्गावर अनेक झाडे कोसळली आहेत. सध्या या वादळाचा परिणाम ओडिशावर आहे.

वादळ आणि पावसाच्या दरम्यान भद्रकमध्ये झाड पडले आहे. चक्रीवादळामुळे ओडिशाच्या किनारी जिल्ह्यातील जगतसिंगपूर, केंद्रापाडा, भद्रक, जाजपूर आणि बालासोरमध्ये मुसळधार पाऊस व वादळ होण्याचा अंदाज आहे.

ओडिशा जिल्ह्यातील बालासोर जिल्ह्यात जोरदार वारे वाहत आहेत. चक्रीवादळांमुळे मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

समुद्रात एक भरती आली असल्यानं या वादळाचा मागोवा घेतला जात आहे. सुपर चक्रीवादळ अम्फानवर विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) मध्ये डॉप्लर वेदर रडार (डीडब्ल्यूआर)द्वारे नजर ठेवली जात आहे.

अम्फान चक्रीवादळ पश्चिम बंगालमधील दिघा आणि बांगलादेशमधील हटिया बेट दरम्यान कुठेतरी धडकू शकते. ओडिशा, पश्चिम बंगाल व्यतिरिक्त सिक्कीम आणि मेघालय येथेही गुरुवारपर्यंत वादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पूर्व मदनापूर, दक्षिण 24-परगणा आणि उत्तर 24-परगना हे तीन किनारपट्टी जिल्हे 'अम्फान' ने सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

या तीन जिल्ह्यांव्यतिरिक्त चक्रीवादळ अम्फानचा हावडा, हुगळी, पश्चिम मिदनापूर आणि कोलकाता या दक्षिण बंगालमधील इतर जिल्ह्यांमध्येही परिणाम होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय आपत्ती दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 19 टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात आहेत.

ओडिशामध्ये 13 टीम तैनात आहेत. तर जवळपास 17 टीमला आपत्कालीन परिस्थितीसाठी राखून ठेवल्या आहेत.

Read in English