Coronavirus: मद्यप्रेमींमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; दारूची ऑनलाइन डिलिव्हरी सुरू होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 03:11 PM2020-05-04T15:11:29+5:302020-05-04T15:29:03+5:30

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेक ठिकाणी दारू पायी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दारुची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दुकाने उघडणार म्हणून तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याच दरम्यान दारू खरेदीसाठी अनेक ठिकाणी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

तळीरामांना सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला आहे. त्यामुळे आता दारू दुकानांमध्ये गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे देखील पालन होईल यासाठी दारूची ऑनलाइन डिलिव्हरी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन अमृत किरण सिंग यांनी ऑनलाइन दारु विक्रीच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

अमृत किरण सिंग म्हणाले की, आम्ही सेफ शील्डची सुरूवात करू. म्हणजेच काउंटवर ट्रे ठेवण्यात येऊन संपर्करहित विक्री केली जाईल.

सेफ शील्डच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दारूच्या होम डिलिव्हरीबाबत चर्चा केली जाईल. यासाठी स्विगी किंवा झोमॅटोसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची मदत घेतली जाईल, असं अमृत किरण सिंग यांनी सांगितले.

सर्व नियमांचे पालन करत याची अंमलबजावणी केल्यास राज्यांना 75 टक्के महसूल मिळेल असा दावा देखील अमृत किरण सिंग यांनी केला आहे.