देवदूत बनून आला पायलट! हायड्रोलिक खराब, ३ तास हवेतच घिरट्या, १४० जणांच्या जीवाला होता धोका; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 11:09 AM2024-10-12T11:09:50+5:302024-10-12T11:39:05+5:30

Air India Express Emergency : काल एअर इंडियाच्या पायलटमुळे १४० जणांचा जीव वाचला. पायलटने हुशारीने विमानाचे लँडिंग केले.

Air India Express Emergency : काल शुक्रवारी मोठी दुर्घटना होता होता वाचली. पायलटच्या हुशारीमुळे १४० जणांचा जीव वाचला. तामिळनाडू येथील त्रिची विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

फ्लाइट AXB 613 ने तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथून संध्याकाळी ५:४० वाजता उड्डाण केले आणि त्याच विमानतळावर रात्री ८:१५ च्या सुमारास उतरले. तिरुचिरापल्ली-शारजाह एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटमध्ये हायड्रोलिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.

विमानाने टेकऑफ केल्यानंतर पायलटला हायड्रोलिकमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. यामुळे पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला. त्यांनी कंट्रोल रुमसोबत संपर्क सुरू ठेवत तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली.

विमानाचे हायड्रोलिक विमानाचे लँडिंग करत असताना महत्वाची भूमिका बजावते, या हायड्रोलिकमध्येच बिघाड झाल्यामुळे लँडिंग करण्यास मोठी अडचणी तयार झाली. त्यामुळे विमानाचे लँडिंग करताना काहीही घडण्याची शक्यता होती. यामुळे धोका टाळण्यासाठी सर्वात आधी विमानातील इंधन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासाठी पायलटने तब्बल तीन तास हवेतच विमानाच्या घिरट्या घालण्यास सुरूवात केली. यानंतर काही वेळाने विमानातील इंधन कमी झाल्याचे लक्षात आले.

यादरम्यान, विमानतळावर तब्बल १८ अग्निशमन बंब तैनात करण्यात आले होते. लँडिंगवेळी विमानाला काहीही होण्याची शक्यता होती. यामुळे आधीच सर्व गोष्टींची काळजी घेण्यात आली.

विमान हवेतचसुमारे तीन तास हवेत चक्कर मारल्यानंतर वैमानिकाने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. यादरम्यान प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.

एअरलाइनच्या वरिष्ठ सूत्रांनी मीडियाला सांगितले की, कॉकपिटमध्ये नेहमीच गोष्टी नियंत्रणात असतात. तरीही विमान सुखरूप उतरेपर्यंत त्रिची विमानतळावर हाय अलर्ट ठेवण्यात आला होता. लँडिंग केल्यानंतर १४० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

नागरी उड्डाण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, "तिरुचिरापल्ली ते शारजाहला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे फ्लाइट IX 613 तिरुचिरापल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. यानंतर DGCA सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. फ्लाइटच्या लँडिंग गिअरमध्ये समस्या निर्माण झाली होती. विमान हवेत असताना इंधन टाकण्याचा विचार केला होता, परंतु विमान लोकवस्तीच्या परिसरात फिरत असल्याने तसे करणे योग्य वाटले नाही, असेही सांगितले .

एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आमच्या कामकाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.