Corona Vaccine: १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस; मात्र कुठे अन् कशी?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:23 PM2021-03-24T13:23:18+5:302021-03-24T13:47:14+5:30

कोणतीही सहव्याधी नसलेल्या ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेता येऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी सांगितले. (corona vaccination in india)

देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ४० हजार ७१५ नवे रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तेराव्या दिवशी वाढ नोंदविण्यात आली आहे. सक्रिय रुग्णसंख्या आता ३ लाख ४५ हजार ३७७ वर पोहोचली आहे. सततच्या रुग्णवाढीमुळे रिकव्हरी रेट ९५.६७ टक्क्यांवर आला आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे संपूर्ण देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारने ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ या त्रिसूत्रीचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्राने दिले. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास जिल्हा, तालुका, शहर किंवा प्रभाग पातळीवर निर्बंध घालू शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोरोनासंदर्भात चिंतेत भर टाकणारी आकडेवारी आली आहे. याचदरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची मोहिम १ एप्रिलापासून सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

कोणतीही सहव्याधी नसलेल्या ४५ वर्षे वयावरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेता येऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी सांगितले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना जावडेकर म्हणाले की, ४५ वर्षे वयावरील तसेच कोणत्याही सहव्याधी नसलेल्या व्यक्ती आता १ एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र असतील. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कृती दल तसेच वैद्यकीय तज्ज्ञ यांच्याशी सल्लामसलत करूनच हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच लसीची दुसरी मात्रा सहा ते आठ आठवड्यांनी घ्यावी, असेही सूचित करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पात्र ठरणाऱ्या सर्वांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जावडेकर यांनी यावेळी केले.

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता ज्या राज्यांमध्ये बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे त्या राज्य प्रमुखांशी केंद्र सरकार संपर्क साधून आहे. या राज्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जात असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की, नियमानुसार जे पात्र आहे त्यांनी नोंदणी करावी आणि लस घ्यावी. मात्र ही लस कधी आणि कशी मिळणार, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

यासाठी ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागेल. यामध्ये दुसरा डोस २८ दिवसानंतर घेण्यासाठी ऑटो शेड्युल फिचर आहे. असं असलं तरीही लस घेणाऱे दुसरा डोस आठ आठवड्याच्या आत कधीही घेऊ शकतात. मात्र यापेक्षा जास्त वेळ घालवू नये असंही सांगण्यात आलं आहे. www.cowin.gov.in वर तुम्ही दुसऱ्या डोससाठी तारीख निवडू शकता.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. यामध्ये व्यक्तीचा जन्म १ जानेवारी १९७७ च्या आधीचा असावा. तसेच लस घेण्यासाठी व्यक्तीला आजारी आहे किंवा नाही यासाठीच्या दाखल्याची गरज नाही. याबाबत असलेली अट काढून टाकण्यात आली आहे.

कोविन अॅप रजिस्ट्रेशनची सिस्टिम ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी १ एप्रिल २०२१ पासून सुरु होईल. लशींचा पुरेसा साठा असून लोकांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. लस घेतल्यानंतर त्याची पावती डिजिटल कॉपी किंवा व्हॅक्सिनेशन सर्टीफिकेटच्या लिंकची मागणी केली पाहिजे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुले खासगी रुग्णालयातही २४ तास कोरोना लस देण्याची सुविधा.

खासगी रुग्णालयांनी लसीच्या किंमतीमध्ये लस प्रमाणपत्रासाठी पैसे आकारले आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. तिथून निघण्यापूर्वी लस घेतल्याचं सर्टीफिकेट मागून घ्या. रुग्णालयाने देण्यास नकार दिला तर याची तक्रार १०७५ या टोल फ्री क्रमांकावर करू शकता. कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी केली असल्यास सरकारी किंवा खासगी रुग्णालयात पुन्हा अपॉइंटमेंटची गरज नाही. जर कोविन अॅप प्रमाणे एखाद्या रुग्णालयाने काम करण्यास नकार दिला तर त्याचीही तक्रार टोल फ्री क्रमांकावर करता येते.

केंद्र सरकारने १६ जानेवारीपासून देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत देशभरातील ५ कोटी १७ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली. देशात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरेसा साठा असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे ते म्हणाले. दोन्ही लसींची परिणामकारकता उत्तम असल्याचा निर्वाळा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.