Arvind Goyal: फक्त राहतं घर ठेवलं, उद्योगपतीने 600 कोटींची संपत्ती केली दान By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 08:44 PM 2022-07-20T20:44:17+5:30 2022-07-20T20:53:30+5:30
उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान करण्याची घोषणा केली. त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत 600 कोटी एवढी असल्याचे समजते. उत्तर प्रदेशच्या मुराबाद येथील उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान करण्याची घोषणा केली. त्यांच्या संपत्तीची एकूण किंमत 600 कोटी एवढी असल्याचे समजते.
गोयल यांनी आपल्याकडे केवळ मुरादाबाद येथील एक घर ठेवले आहे. गेल्या 50 वर्षांत त्यांनी कष्टाने ही संपत्ती कमावली होती. आता, थेट राज्य सरकारला ही संपत्ती दान केली आहे.
उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत गोयल यांच्या 100 पेक्षा अधिक शिक्षणसंस्था, वृद्धाश्रम आणि रुग्णालयातही ते ट्रस्टी आहेत. मात्र, आता त्यांनी हे सर्वच सरकारला देण्याचा निर्णय घेतला आहे.
गोयल यांनी लॉकडाऊन काळतही 50 गावांच्या देखभालीची जबाबदारी स्विकारली होती. तसेच, या गावांना मोफत जेवण आणि औषधोपचार त्यांच्यामार्फतच करण्यात आला होता.
गोयल यांच्या कुटुंबात 2 मुले आणि 1 मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे. त्यांचा एक मुलगा मधुर हा मुंबईत वास्तव्यास आहे, तर लहान मुलगा शुभम हा मुरादाबाद येथे राहून वडिलांच्या उद्योगात मदत करतो.
गोयल यांची मुलगी लग्नानंतर बरेली येथे राहत असून तिचे पती सैन्य दलात कर्नल आहेत. विशेष म्हणजे 2 मुले आणि मुलीनेही त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर, पत्नीनेही त्यांचे कौतुक करत साथ दिली.
अरविंद गोयल यांनी सोमवारी रात्री संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, 25 वर्षांपूर्वीच मी स्वत:ची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता, असे ते म्हणाले. तसेच, एक घडलेला प्रसंगही सांगितलं.
डिसेंबर महिना होता, मी रेल्वेने प्रवास करत होतो. समोर एक गरीब माणूस थंडीत कुडकुडत होता. त्याच्याकडे अंग झाकण्यासाठी चादर नव्हती किंवा पायात बुटही नव्हते. त्यावेळी, मी माझे बुट त्याला दिले. पण, मला थंडीचा त्रास झाला.
त्या दिवसापासून मी विचार केली की, या गरिब माणसाप्रमाणे देशात किती लोकं असतील. तेव्हापासून मी गरिबांना मदत करायला सुरुवात केली.
आता मी चांगली प्रगती केली आहे. मात्र, आयुष्य हे बेभरवशाचं आहे, म्हणूनच जिवंतपणीच मी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतल्याचं गोयल यांनी सांगितलं.
गोयल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यापूर्वी देशाच्या 4 राष्ट्रपतींनी त्यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभादेवी पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार झाला आहे.