'आयुष्मान कार्ड' धारकांसाठी महत्त्वाची बातमी; १० लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 11:37 AM2024-07-08T11:37:52+5:302024-07-08T12:39:14+5:30

जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.

नवी दिल्ली : आयुष्मान भारत कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुमच्या घरातील कोणी आजारी पडल्यास तुम्हाला १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे.

यासाठी तुम्हाला फक्त हे कार्ड दाखवायचे आहे. आयुष्मान भारत कार्डवरील कव्हरेजची रक्कम ५ लाखांवरून १० लाखांपर्यंत वाढविण्याचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे.

ही रक्कम मंजूर झाल्यास जवळपास १२ कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही या योजनेत सामावून घेण्याची सरकारची तयारी आहे.

केंद्र सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आपल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB-PMJAY) लाभार्थ्यांची संख्या पुढील तीन वर्षांत दुप्पट करण्याचा विचार करत आहे.

असे झाल्यास देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळू शकेल. सुरुवातीला ७० वर्षांवरील सर्व लोकांना या योजनेच्या आणले जाईल. यासंदर्भात काही घोषणा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात होऊ शकतात.

जर सरकारने यासंदर्भातील घोषणा केल्यास सरकारी तिजोरीवर दरवर्षी १२,०७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प २०२४ मध्ये सरकारने योजनेचे वाटप वाढवून ७२०० कोटी रुपये केले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २७ जून रोजी संसदेत आपल्या भाषणात सांगितले होते की, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना आता आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाईल आणि त्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळेल.

सरकारी सूत्रांनी सांगितले की, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्याचा लाभ मिळाल्यास ही संख्या आपोआप चार ते पाच कोटींनी वाढेल. आयुष्मान भारत कार्डमुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध आहेत. त्यांना एक रुपयाही द्यावा लागत नाही. कॅन्सरसारख्या आजारापासून लोकही आपल्या कुटुंबाला वाचवतात.

आयुष्मान भारत कार्ड या योजनेचे यश पाहून नीती आयोगाने तिचा विस्तार करण्याची सूचना केली होती. जवळपा ३० टक्के लोकांकडे कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा नाही, त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा, असे सांगण्यात आले.