bageshwar dham News : हनुमान चालिसेचा प्रचार करणे अंधश्रद्धा नाही; क्लीन चिट मिळाल्यानंतर बाबांची पहिली प्रतिक्रिया By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 08:58 PM 2023-01-25T20:58:26+5:30 2023-01-25T21:08:21+5:30
bageshwar dham News : बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र शास्त्री यांना नागपूर पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. पोलिसांना त्यांच्या दरबारमध्ये अंधश्रद्धा आढळली नाही. bageshwar dham News : नागपूर पोलिसांनी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नागपूर पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले की, व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडीओमध्ये अंधश्रद्धेसारखे काहीही नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा तक्रारदार श्याम मानव यांना लिखित स्वरुपात उत्तरही पाठवले आहे.
धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया- यानंतर बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जर हनुमान चालिसेचा प्रचार करणे अंधश्रद्धा आहे, तर सर्व हनुमान भक्तांना तुरुंगात जायला हवं. माझा कायद्यावर विश्वास होता आणि सत्याचा विजय झाला. रामचरितमानस हा राष्ट्रीय धर्म घोषित करावा. तरच भारत विश्वगुरू बनेल आणि तरच सामाजिक समरसता निर्माण होईल, असे ते म्हणाले.
भाविकांमध्ये आनंदाची लाट- अनेक दिवसांनंतर बागेश्वर धाममध्ये बाबा दिसल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी होऊन परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. दरम्यान, अंनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्री अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप केला होता. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात असल्याचे ते म्हणाले होते.
देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असल्याचा आरोपही अंनिसने केला होता. तसेच, महाराजांवर कारवाई करण्याची मागणीही समितीने पोलिसांकडे केली होती. पोलिस आयुक्तांकडे आणि नंतर नागपूर गुन्हे शाखेकडे दोन वेळा तक्रार करण्यात आली. पण, अखेर तपासानंतर पोलिसांनी धीरेंद्र शास्त्री यांना क्लीन चीट दिली आहे.
यानंतर श्याम मानव यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासणार असल्याचंही ते म्हणाले. याप्रकरणी पूर्णतः कायद्याचं उल्लंघन झाला असताना पोलिसानी नकार दिला आहे. जर कोणी देवाच्या नावावर आश्वासन देत असेल तर अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा देणं या जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे, असे श्याम मानव यांनी म्हटले.