Bageshwar Dham Sarkar: धीरेंद्र महाराजांचे संन्यासी बाबा कोण? हनुमान नाही तर ‘यां’च्या कृपेने होतात दरबारात चमत्कार! By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:50 PM 2023-02-02T13:50:35+5:30 2023-02-02T13:58:13+5:30
Bageshwar Dham Sarkar: धीरेंद्र कृष्ण शास्त्री कायम ज्यांचा उल्लेख करतात, ते संन्यासी बाबा नेमके कोण आहेत? बागेश्वर बाबाच्या मते कोणाच्या कृपेने दरबारात दिव्य चमत्कार होतात? जाणून घ्या... Bageshwar Dham Sarkar: बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा अचानक चर्चेत आले आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेले आव्हान बागेश्वर बाबाने स्वीकारले. यानंतर देशभरात बागेश्वर बाबांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे बागेश्वर बाबांवर टीकाही करण्यात आली.
तसेच अलीकडेच बागेश्वर बाबा म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी आपल्या विवाहाबाबत खुलासा केला. आपण देव नसून सामान्य माणूसच आहोत. लवकरच विवाह करणार असल्याचे बागेश्वर बाबाने स्पष्ट केले. बागेश्वर बाबा त्यांच्या कथा आणि दैवी दरबारात नेहमी जय संन्यासी बाबांचा उल्लेख करतात, त्यांचा जयजयकार करतात. बागेश्वर बाबा स्वतःला हनुमंतांचे भक्त असल्याचे सांगतात. पण त्यानंतर ते संन्यासी बाबांची आठवणही काढतात. कोण आहेत ते संन्यासी बाबा?
बागेश्वर धाम सरकार दरबारात आलेल्या लोकांच्या मनातील गोष्टी ओळखतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री दर शनिवारी आणि मंगळवारी बागेश्वर धाम येथे दिव्य दरबार भरवतात. यात येथे अर्जी देणाऱ्या भाविकांचे प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी ऐकली जातात. आणि बागेश्वर बाबा भाविकांच्या समस्यांवर उपाय सांगतात. एका पानावर ते समस्या आणि त्यावरील उपाय लिहून देतात.
बागेश्वर धाम येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री संन्यासी बाबांचा जयजयकार करतात. हे संन्यासी बाबा म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे पणजोबा आहेत. आश्रमाशी संबंधित लोकांच्या मते, बागेश्वर बाबांच्या पणजोबांनी बागेश्वर बालाजीचे मंदिर बांधले होते.
बागेश्वर सरकारचे पणजोबा मंदिरात पूजा करायचे. ते दैवी दरबारही भरवत असत. बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ज्याप्रकारे प्रसिद्धी मिळाली, तशी प्रसिद्धी त्यांच्या कुटुंबातील कोणालाही मिळाली नाही. बागेश्वर बाबा आपल्या पणजोबांना संन्यासी बाबा म्हणतात.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांच्या मते, पणजोबांची अपार कृपा त्यांच्यावर आहे. आणि त्यामुळे भाविकांच्या कोणत्याही समस्येचे समाधान त्यांना शोधता येते. हनुमानाचे भक्त असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या पणजोबांना खूप मानतात आणि यशाचे, समस्यांचे निराकरण करण्याचे श्रेय त्यांच्या पणजोबांना देतात.
बागेश्वर धाम सरकारने सांगितले की, बागेश्वर धाममध्ये १२१ गरीब मुलींच्या लग्नाची तयारी सुरू आहे. या १२१ मुलींना घरातील सर्व सामान दिले जाईल. गेल्या चार वर्षांपासून बागेश्वर धाम सरकारमध्ये गरीब मुलींच्या विवाहाचे आयोजन केले जाते.
दरम्यान, नागपुरात श्रीराम चरित्रावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा दरबार होता. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप केला. यानंतर चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान देत, ३० लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून जाहीर करण्यात आले.
हे आव्हान बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले. भारतात चादर चढवणे आणि मेणबत्ती लावणे ही श्रद्धा आहे, पण नारळ बांधणे ही अंधश्रद्धा आहे. लोकांमध्ये हा दांभिकपणा कुठून येतो माहिती नाही. देशात हिंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. यामुळे त्यांनाही टार्गेट केले जात आहे, मात्र, या गोष्टींमुळे घाबरणार नाही, असा इशारा बागेश्वर बाबा यांनी दिला होता.