सीमेवरची ती चकमक ज्यात भारतीय लष्कराने चीनला दिला होता धोबीपछाड By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 02:49 PM 2020-06-16T14:49:37+5:30 2020-06-16T15:11:22+5:30
भारत आणि चीनमधील सैनिकी संघर्षाचा विषय निघाल्यावर आपल्या डोळ्यांसमोर १९६२ च्या युद्धातील पराभवाच्या कटू आठवणी येतात. मात्र या पराभवानंतर पाच वर्षांनी झालेल्या एका चकमकीत भारताने चीन्यांची दाणादाण उडवली होती. ती घटना मात्र अनेकांच्या ऐकिवात नसेल. गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सुरू असलेल्या तणावाचे पर्यावसान हिंसक चकमकीत होऊन त्यात एका अधिकाऱ्यासह भारताच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे.
या घटनेमुळे सुमारे पान्नास वर्षे किरकोळ घटना वगळता शांत असलेल्या आणि एकही गोळी न चाललेल्या भारत चीन सीमेवर पुन्हा एकदा हिंसक संघर्ष सुरू होतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
भारत आणि चीनमधील सैनिकी संघर्षाचा विषय निघाल्यावर आपल्या डोळ्यांसमोर १९६२ च्या युद्धातील पराभवाच्या कटू आठवणी येतात. मात्र या पराभवानंतर पाच वर्षांनी झालेल्या एका चकमकीत भारताने चीन्यांची दाणादाण उडवली होती. ती घटना मात्र अनेकांच्या ऐकिवात नसेल.
१९६७ मध्ये झालेल्या त्या संघर्षावेळी भारताच्या शूर जवानांनी चीनी सैनिकांच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले होते. भूराजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या नथू ला येथे झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी चीनच्या शेकडो सैनिकांना ठार केले होते. या घटनेनंतर आजपर्यंत भारतीय जवानांवर गोळी चालवण्याची हिंमत चीनी सैनिकांनी केली नव्हती.
नथू ला खिंड समुद्र सपाटीपासून १४ हजार २०० फूट उंचीवर तिबेट-सिक्कीम सीमेवर आहे. १९६५ च्या भारत -पाकिस्तान युद्धावेळी चीनने भारताला नथू ला आणि झेलेप ला रिकामे करण्यास सांगितले होते. त्यावेळी भारताने झेलेप ला खाली केले, मात्र नथू ला वरील कब्जा कायम ठेवला. तेव्हापासून आजपर्यंत नथू ला चीनच्या ताब्यात आहे.
येथेच १९६७ साली संघर्षाची ठिणगी पडली होती. येथील संरक्षणाची जबाबदारी ले.कर्नल राय सिंह यांच्याकडे होती.
येथे गस्तीदरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सातत्याने धक्काबुक्की होत असे. सतत होणाऱ्या या संघर्षामुळे भारतीय लष्कराने या भागात तार लावण्याचे काम सुरू केले. हे काम ७० फिल्ड कंपनी अॉफ इंजिनियर्स आणि १८ राजपूतच्या तुकडीकडे सोपवण्यात आले. काम सुरू झाल्यावर चीनी सैन्यातील पॉलिटिकल कमिसारने राय सिंह यांना फोन करून काम थांबवण्यास सांगितले.
त्यानंतर बंकरमध्ये परतलेल्या चीनी सैनिकांनी भारताच्या जवानांवर अचानक गोळीबार केला. यामध्ये सुरुवातीला भारतीय पथकाचे मोठे नुकसान झाले. स्वतः राय सिंह जखमी झाले. चीनला प्रत्युत्तर देणारे कँप्टन डागर आणि मेजर हरभजन सिंह शहीद झाले.
या झटापटीत भारताचे ७० जवान धारातीर्थी पडले. मात्र त्यानंतर प्रत्युत्तर देण्याची वेळ भारताची होती. सेबू ला आणि कँमल्स बँकमधील अनुकूल रणनीतिक परिस्थितीचा लाभ घेत भारतीय जवानांनी चीन्यांवर तोफखान्याचा मारा केला. त्यात चीनचे सुमारे ४०० सैनिक मारले गेले.
पुढचे तीन दिवस भारताकडून सातत्याने गोळीबार सुरू होता. त्यानंतर गोळीबार न थांबल्यास हवाई हल्ला करण्याची धमकी चीनने दिली. पण तोपर्यंत चीन्यांना अद्दल घडली होती. पुढे १५ सप्टेंबर रोजी ले.ज. जगजीत सिंह अरोरा आणि ले.ज. सॅम माणेकशॉ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहांची अदलाबदल झाली.
मात्र घटनेला पंधरवडा उलटत नाही तोच चीनने चाओ ला परिसरात पुन्हा कुरापत काढली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ७/११ गोरखा रायफल्स आणि १० जँक रायफल्स या भारतीय बटालियन्सनी चीनला पुन्हा अद्दल घडवली.
या घटनेनंतर आजपर्यंत चीनने सीमेवर भारताच्या दिशेने गोळी चालवली नव्हती. मात्र आज चीनी सैन्याने लडाखमध्ये हिंसाचार करून भारताच्या तीन जवानांची हत्या केली. आता याला भारताकडून कसे प्रत्युत्तर मिळते हे पाहावे लागेल.