सावधान! कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय, गेल्या २४ तासांत ४६ हजार रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 12:16 IST2020-11-21T11:46:42+5:302020-11-21T12:16:39+5:30

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवरून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, आता देशातील कोरोना रूग्णांची संख्या ९१ लाखांच्या आसपास जाईल. गेल्या २४ तासांत देशात ४६ हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत एक हजार रुग्ण अधिक आढळून आले आहेत. नवीन रुग्णांची भर पडल्याने देशातील एकूण रुग्णसंख्याही वाढली आहे.

आरोग्य मंत्रायलाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार २३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णवाढ झाल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या ९० लाख ५० हजार ५९८ वर पोहोचली आहे.

याशिवाय, देशात २४ तासांत ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या १ लाख ३२ हजार ७२६ इतकी झाली आहे. सध्या देशात ४ लाख ३९ हजार ७४७ रुग्ण उपचार घेत आहेत.

आतापर्यंत देशात ८४ लाख ७८ हजार १२४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४९ हजार ७१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशात गेल्या २४ तासांत १० लाख ६६ हजार २२ चाचण्या करण्यात आल्या.

दरम्यान, कोरोनामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांना आता पुन्हा एकदा खबरदारीच्या दृष्टीने पावले उचलणे भाग पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही शहरांत उद्या रात्रीपासून नाईट कर्फ्यू लावला जाणार आहे.

गुजरातच्या राजकोट, सूरत आणि बडोद्यामध्ये, आजपासून आवश्यक आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या लोकांशिवाय कुणालाही रात्री ९ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत बाहेर येण्याची परवानगी नसणार आहे.

याचबरोबर, मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, विदिशा आणि रतलाममध्येही आजपासून रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. मात्र, या काळात आवश्यक सेवा पुरविणाऱ्या तसेच फॅक्ट्री वर्कर्सना सूट दिली जाईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे, सुरूवातीच्या काळात कोरोना रुग्णांवर वापरण्यात येणारे रेमेडिसिविर हे औषध जागतिक आरोग्य संघटनाने शुक्रवारी औषधांच्या यादीतून वगळले आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध सर्रास देण्यात येत होते.

Read in English