Bhaiyyuji Maharaj Suicide कोण होते भय्यूजी महाराज ? का केली त्यांनी आत्महत्या ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 04:40 PM2018-06-12T16:40:22+5:302018-06-12T16:58:06+5:30

अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इंदूरमधील ‘सिल्वर स्प्रिंग’ या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:चं जीवन संपवलं.

भय्यूजी महाराजांचं खरं नाव उदयसिंह देशमुख होतं. इंदूरमधील बापट भागात असलेल्या त्यांच्या आश्रमातूनच ते सामाजित कार्य करीत असत.

मध्य प्रदेशात नर्मदा नदीसाठी जनजागृती अभियान चालवण्यासाठी एक विशेष समिती स्थापण्यात आली होती आणि त्यात भय्यूजी महाराजांचाही समावेश होता. त्यानिमित्त त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता, जो त्यांनी नाकारला होता.

भय्यूजी महाराजांची सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ओळख होती. देशातील अनेक राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल तसंच अनेक सिनेकलाकार त्यांच्या आश्रमात जायचे.

महाराष्ट्रातील मराठा मोर्चा काळात भय्यूजी महाराजांवर हल्ले झाले होते. त्यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं 2016 रोजी दाखल केली होती. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप होते, तर कारचालक आणि सहकारी जखमी झाले होते.

भय्यु महाराज सुरुवातीला नोकरी करायचे. घोडेस्वारी आणि तलवारबाजीत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवलं होतं. त्यांनी ब-याच कविताही केल्या होत्या. तरुण वयात त्यांनी सियाराम शूटिंग शर्टिंगच्या पोस्टरसाठी मॉडेलिंगही केलं होतं.

त्यांना भगवान दत्ताचा आशीर्वाद लाभल्याचीही लोकांमध्ये चर्चा होती. महाराष्ट्रात त्यांना राष्ट्रसंताचा दर्जा बहाल करण्यात आला होता. ते सूर्याची उपासना करायचे तसेच त्यांनी पाण्यातही साधना केली होती, असं म्हटलं जातं.

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे ते जवळचे समजले जायचे. भाजपा नेते नितीन गडकरी ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. भय्यूजी महाराज स्वत: पद, पुरस्कार, शिष्य आणि मठाचे विरोधी होते. व्यक्तीपूजेचा ते नेहमीच द्वेष करत होते.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात त्यांची अनेक आश्रमं आहेत. भय्यूजी महाराज हे ग्लोबल वॉर्मिंगनेही चिंतीत होते. त्यामुळे गुरुदक्षिणेच्या नावाखाली ते इतरांना झाडे लावण्याचा सल्ला द्यायचे. आतापर्यंत त्यांनी 18 लाख झाडे लावली आहेत. देवास आणि धार या आदिवासी जिल्ह्यांत त्यांनी जवळपास 1 हजार तलाव खोदले आहेत.

भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या स्त्रियांच्या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते. त्यासोबतच, बुलडाण्यातील खामगाव जिल्ह्यात आदिवासींच्या 700 मुलांसाठी त्यांनी शाळा उभारली होती. तसेच, शाळेच्या स्थापनेआधी त्यांनी पारधी जमातीच्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता.

भय्यूजी महाराजांनी त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये भक्तांना शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यात ते म्हणाले, 'मासिक शिवरात्री'ला 'महाशिवरात्री' म्हटलं जातं. मी सर्व भक्तांना या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा देतो'. याशिवाय त्यांनी आणखी दोन ट्विटमधून महाशिवरात्रीचं महत्त्व सांगितलं आहे.

काही वेळापूर्वीच त्यांच्या खोलीत आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली. इंग्रजी भाषेत लिहलेल्या या एकपानी पत्रात भय्युजी महाराजांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. आयुष्यातील ताणतणावांना मी कंटाळलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये, असे भय्युजी महाराजांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

भय्युजी महाराजांच्या आत्महत्येविषयी बोलताना माधव भंडारी म्हणाले की, ‘माझा आणि भय्युजी महाराजांचा अनेक वर्षांचा स्नेहसंबंध होता. साधारण महिनाभरापूर्वीच आमची भेट झाली होती. तेव्हा ते काहीसे थकल्यासारखे वाटत होते. मात्र, ते इतक्या टोकाचे पाऊल उचलतील, असे वाटले नव्हते.’