अजब कारभार! कोरोना संकटात आरोग्य केंद्राचं रुपांतर गोशाळेत; डॉक्टर, नर्सऐवजी गायींचा मुक्काम By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:44 PM 2021-05-24T16:44:24+5:30 2021-05-24T16:57:44+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशभरातील विविध रुग्णालयात कोरोग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या 2,67,52,447 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,03,720 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच विविध उपाय केले जात आहेत.
कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाच्या चिंतेत भर टाकत आहे. देशभरातील विविध रुग्णालयात कोरोग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.
रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे.
ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. या महाभयंकर संकटात रुग्णालयात लोकांना बेड उपलब्ध होत नाही आहे. असं असताना दुसरीकडे मात्र एका आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
बिहारच्या एका गावामध्ये एका आरोग्य केंद्रात चक्क गोशाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या केंद्रात रुग्णांऐवजी गायी बांधण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.
बिहार मधुबनीच्या खाजौलीतील सुक्की गावात सरकारी आरोग्य केंद्राचा वापर हा कोरोनाच्या संकटात देखील गोशाळा म्हणून केला जात आहे. या केंद्रात डॉक्टर, नर्स येत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
गावातील एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि नर्स यांना ड्यूटीसाठी पाठवलंच जात नाही. गेल्या वर्षभरापासून येथे कोण आलंच नाही. आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा यायला हवं.
आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आलेले आरोग्य कर्मचारी कोरोनामुळे खजौली येथील प्राथमिक रुग्णालयात काम करत आहेत. गावातील हे आरोग्य केंद्र गेल्या 30 वर्षापासून सुरू असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणे आहे.