दबंग पतींचं खासदारकीचं स्वप्न पत्नी करणार पूर्ण, बिहारमध्ये चार बाहुबलींच्या सौभाग्यवती रिंगणात By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:08 PM 2024-03-29T17:08:53+5:30 2024-03-29T17:13:44+5:30
Bihar Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक बाहुबली नेत्यांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यापैकी अनेकांनी आपल्या दबंगगिरीचा प्रभाव पाडत त्यांच्या पत्नींना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये या बाहुबलींच्या पत्नी रिंगणात असल्या तरी पडद्यामागून तेच निवडणूक लढवताहेत, अशी परिस्थिती आहे. यापैकी काही खास उदाहरणं पुढीलप्रमाणे बिहार, उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये दबंगगिरी करणाऱ्या बाहुबली नेत्यांचा असलेला प्रभाव सर्वश्रुत आहे. गुन्हेगारीचा शिक्का आणि न्यालयातून झालेली शिक्षा यामुळे यापैकी अनेक बाहुबली नेते स्वत: निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे यातील अनेक नेते हे आपले नातेवाईक आणि निकटवर्तियांना निवडणुकीच्या मैदातान उतरवून आपल्या भागावरील प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही अनेक बाहुबली नेत्यांनी त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच त्यापैकी अनेकांनी आपल्या दबंगगिरीचा प्रभाव पाडत त्यांच्या पत्नींना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये या बाहुबलींच्या पत्नी रिंगणात असल्या तरी पडद्यामागून तेच निवडणूक लढवताहेत, अशी परिस्थिती आहे. यापैकी काही खास उदाहरणं पुढीलप्रमाणे
लवली आनंद माजी खासदार लवली आनंद ह्या बाहुबली नेते आनंद मोहन यांच्या पत्नी आहेत. नितीश कुमार यांच्या जेडीयूने त्यांना शिवहर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आनंद मोहन हे १९९६ आणि १९९८ मध्ये शिवहर मतदारसंघातून निवडून आले आहेत. आनंद मोहन मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात तुरुंगातून बाहेर आले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तुरुंग नियमावलीत काही बदल केल्याने त्यांची सुटका शक्य झाली होती. शिक्षा झालेली असल्याने आनंद मोहन हे स्वत: निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी पत्नी लवली आनंद यांना जेडीयूकडून तिकीट मिळवून दिले आहे.
बीमा भारती बीमा भारती ह्या कुख्यात गुन्हेगार अवधेश मंडल यांची पत्नी आहे. बीमा भारती यांना लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीने पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अवधेश मंडल यांच्याविरोधात हत्या आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. तसेच एक बाहुबली आणि गुन्हेगार अशी त्यांची प्रतिमा आहे. अवधेश मंडल यांची पत्नी बीमा भारती पाच वेळा आमदार राहिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी जेडीयूचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या आरजेडीमध्ये दाखल झाल्या होत्या.
विजयलक्ष्मी देवी यावेळी जेडीयूच्या तिकिटावर सिवान लोकसभा मतदारसंघातून लढवणाऱ्या विजयलक्ष्मी देवी ह्या बाहुबली नेते रमेश सिंह कुशवाहा यांच्या पत्नी आहेत. रमेश सिंह कुशवाहा यांचा संबंध सीपीआय एमएलशी आहे. तसेच ते शिवजी दुबे हत्याकांडामधील प्रमुख आरोपी आहेत. रमेश सिंह कुशवाहा स्वत: माजी आमदार आहेत. यावेळी रमेश सिंह कुशवाहा यांनी त्यांची पत्नी विजयलक्ष्मी देवी यांना जेडीयूकडून उमेदवारी मिळवून दिली आहे. सिवानमध्ये कविता सिंह ह्या विद्यमान खासदार आहेत. त्या बाहुबली नेते अजय सिंह यांची पत्नी आहेत. नितीश कुमार यांनी त्यांचं तिकीट कापून यावेळी विजयलक्ष्मी देवी यांना उमेदवारी दिली आहे.
अनीता कुमारी अनीता कुमारीह ह्या आरजेडीच्या तिकिटावर मुंगेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अनीत कुमारी ह्या नवादामधील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते अशोक महतो यांच्या पत्नी आहेत. अशोक महतो हे १७ वर्षांची शिक्षा भोगून गतवर्षी तुरुंगाबाहेर आले होते. अशोक महतो हे स्वत: निवडणूक लढवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या पत्नी अनीता कुमारी यांना उमेदवारी दिली. त्या जेडीयूचे नेते लल्लन सिंह यांच्याविरोधात लढतील.