Bihar Political Crisis: महाराष्ट्रात घडलं अन् बिहारमध्ये बिघडलं; नितीश कुमारांचा भाजपाला 'दे धक्का'?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:23 PM2022-08-09T12:23:21+5:302022-08-09T12:25:30+5:30

महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर आता बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जेडीयू आमदार, खासदार मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. भाजपा-जेडीयू यांच्यात बिनसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यातूनच नितीश कुमार भाजपाशी काडीमोड घेणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

बिहारमध्ये भाजपा-जेडीयू सरकार कोसळणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. मीडिया माहितीनुसार मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राज्यपालांना भेटण्याची वेळ मागितली आहे. तर नितीश कुमार यांच्यासोबत आरजेडीचे तेजस्वी यादवही राज्यपालांना भेटणार आहेत. जेडीयू आमदार, खासदारांच्या बैठकीसोबत आरजेडी आमदारांचीही बैठक होणार आहे. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

तर बिहारमध्ये सत्तांतर पाहायला मिळणार असून आजच्या बैठकीनंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. बिहारमध्ये महाआघाडी पुन्हा उदयास येणार असून या आघाडीचे मुख्यमंत्री नितीश कुमार असतील असा दावा काँग्रेस नेते शकील अहमद यांनी केला आहे. तर नितीश कुमार जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. हा निर्णय बिहारच्या जनतेच्या हिताचा असेल असा विश्वास जेडीयू खासदार चंद्रेश्वर प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

बिहारमध्ये एकूण २४३ सदस्य संख्या आहे. याठिकाणी बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ सदस्यांची गरज आहे. सध्याचं चित्र बिहारमध्ये सर्वात मोठी पार्टी आरजेडी आहे. त्यांच्याकडे ७९ आमदार आहेत. तर भाजपाकडे ७७, जेडीयू ४५, काँग्रेसकडे १९, कम्युनिस्ट पार्टीकडे १२ आणि एआयएमआयएम १, हिंदुस्तानी आवाम मोर्चा ४ यासह इतर अपक्ष आमदार आहेत.

जेडीयूकडे ४५ आमदार आहेत तर सरकार बनवण्यासाठी त्यांना ७७ आमदारांची गरज आहे. मागील काही दिवसांत जेडीयू आणि आरजेडी यांच्यात जवळीक वाढली आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाआघाडीकडे १२४ संख्याबळ आहे जे बहुमतापेक्षा जास्त आहे. या आघाडीत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीही सहभागी होऊ शकते. असे झाल्यास महाआघाडीकडे १५५ पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ असेल.

महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याला ५० आमदारांनी साथ दिली. शिंदे यांच्या भूमिकेमुळे राज्यात अस्तित्वात असलेले महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले. ५० आमदारांनी सरकारविरोधी भूमिका घेतल्यानं मविआ सरकार अल्पमतात आले. त्यानंतर बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश दिले. परंतु सभागृहात बहुमत चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

महाराष्ट्रात शिंदे यांच्या बंडखोरीत भाजपानं कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असे सातत्याने भाजपा नेते सांगत होते. मात्र शिंदे यांच्या बंडाला रसद पुरवण्याचं काम भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू होते. राज्यात घडणाऱ्या सत्तानाट्यात भाजपाची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे भाजपासाठी महाराष्ट्रात घडलं आणि बिहारमध्ये बिघडलं अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे.