छोटासा पक्षी कसा घडवू शकतो अवाढव्य विमानाचा अपघात, पक्ष्यांची धडक कधी ठरते धोकादायक? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 18:06 IST2024-12-29T17:55:27+5:302024-12-29T18:06:03+5:30
bird strike On Plane : दक्षिण कोरियामध्ये आज झालेल्या एका भीषण विमान अपघातात १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताच्या प्राथमिक कारणांबाबत विचारलं असता मुआन फायर स्टेशनचे प्रमुख ली जियोंग-ह्योन यांनी सांगितले की, पक्ष्यांचा थवा विमानावर आदळल्याने (बर्ड स्ट्राईक) हा अपघात झाला असावा. त्या पार्श्वभूमीवर आपण बर्ड स्ट्राइक म्हणजे काय आणि ती किती धोकादायक ठरू शकते, याचा आपण आढावा घेऊयात.

दक्षिण कोरियामध्ये आज झालेल्या एका भीषण विमान अपघातात १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धावपट्टीवर उतरत असताना हे विमान घसरून समोरील कुंपणाला आदळले आणि हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताच्या प्राथमिक कारणांबाबत विचारलं असता मुआन फायर स्टेशनचे प्रमुख ली जियोंग-ह्योन यांनी सांगितले की, पक्ष्यांचा थवा विमानावर आदळल्याने (बर्ड स्ट्राईक) हा अपघात झाला असावा. त्या पार्श्वभूमीवर आपण बर्ड स्ट्राइक म्हणजे काय आणि ती किती धोकादायक ठरू शकते, याचा आपण आढावा घेऊयात.
विमानाला जेव्हा पक्षी किंवा पक्ष्यांचा थवा धडकतो तेव्हा त्याला बर्ड स्ट्राईक असं म्हणतात. ही बाब विमानाच्या सुरक्षेबाबतच्या सर्वात सामान्य किंवा गंभीर धोक्यांपैकी एक बाब आहे. बर्ड स्ट्राइक ही बहुतकरून टेक ऑफ आणि लँडिंगदरम्यान घडते. मात्र प्रत्येक बर्ड स्ट्राइक ही एवढी धोकादायक नसते. मात्र काही वेळा पक्ष्यांनी दिलेली ही धडक मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरते. जेव्हा पक्षी विमानाला बॉडीला धडकतात, तेव्हा ती एवढी गंभीर बाब नसते. मात्र जर पक्षी विमानाच्या इंजिनाला धडकून आत गेला, तर त्यामुळे विमानाच्या इंजिनाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे विमानाच्या गतीवर परिणाम होऊन त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होऊ शकतं.
इंजिनामध्ये पक्षी फसल्यास त्यामुळे फॅन ब्लेड नुकसानग्रस्त होऊ शकता. त्यामुळे इंजिन फेल होऊ शकतं. अशा परिस्थितीत वैमानिक जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्याचा प्रयत्न करतात.
अमेरिकेमध्ये २००९ मध्ये बर्ड स्ट्राइकची अजब घटना घडली होती. त्यावेळी यूएस एअरवेजच्या १५४९ या विमानाने न्यूयॉर्क येथून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये पक्षांची धडक बसल्याने बिघाड झाला होता. त्यावेली कॅप्टन चेस्ली सुलनबर्गर यांनी विमानाला हडसन नदीमध्ये सुरक्षितरीत्या उतरवत सर्व १५५ प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
छोट्या विमानांना बर्ड स्ट्राइकमुळे अधिक नुकसान होतं. मात्र बोईंग ७३७ आणि एअरबस ए३२० सारखी मोठी प्रवासी विमाने एका इंजिनाच्या मदतीने सुरक्षित लँडिंग करण्यात सक्षम असतात. मात्र उड्डाण करताना आणि उतरताना पक्षी धडकल्यास त्यामुळे पक्ष्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वाढते.
विमानतळाजवळ पक्ष्यांच्या उपस्थिती ही बर्ड स्ट्राइकचं सर्वात मोठं कारण असतं. पावसाळ्यात पाणी साठल्याने आणि कीटकांची संख्या वाढल्याने अशा ठिकाणी पक्ष्यांची ये जा वाढते. त्याशिवाय विमानतळाजवळ कचऱ्याचा ढीगसुद्धा तेथील पक्षांच्या वाढत्या संख्येस कारणीभूत ठरतो.
आधुनिक जेटलायनर विमानामध्ये टर्बोफेन इंजित असतात. त्यामध्ये पक्षी आदळल्याने गंभीर नुकसान होऊ शकतं. इंजिन निर्मात्या कंपन्या सुरक्षा तपासणीसाठी विमानाच्या इंजिनात गोठलेल्या कोंबड्या टाकून चाचण्या घेतात. मात्र प्रत्यक्षात अशा बर्ड स्ट्राइकची घटना घडते तेव्हा इतरही घटक त्याला कारणीभूत ठरतात. दक्षिण कोरियामध्ये आज झालेल्या विमान अपघातामुळे विमान सुरक्षेमधील बर्ड स्ट्राइकचा प्रश्न गंभीरपणे समोर आणला आहे.