अंतर्गत गटबाजी... परकीय हात... अन्...; समोर आली लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीची ५ महत्वाची कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 01:11 PM2024-07-16T13:11:32+5:302024-07-16T13:38:41+5:30

या आढावा बैठकांमध्ये ५ गोष्टी प्रामुख्याने बोलल्या जात असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे...

लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल भाजपच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाही. या निकालासंदर्भात भाजपचे अद्यापही मंथन सुरू आहे. पक्ष राज्या-राज्यांत वर्किंग कमिटीच्या बैठका घेऊन निवडणूक निकालांचा आढावा घेत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्ये बैठका झाल्या आहेत.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीत भाजपला अशा निकालाचा सामना का करावा लागला? यावर चिंतन झाले. या बैठकांमध्ये राज्यातील नेत्यांबरोबरच केंद्रीय नेत्यांनाही निरीक्षक म्हणून पाठवले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः उत्तर प्रदेशात उपस्थित होते. या आढावा बैठकांमध्ये ५ गोष्टी प्रामुख्याने बोलल्या जात असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

संविधान बदलण्याची अफवा - या बैठकांमध्ये एक गोष्ट सर्वांकडून बोलली जात आहे आणि ती म्हणजे, विरोधकांनी संविधान बदण्याची आणि त्या आधारे आरक्षण संपवण्याची अफवा पसरवली. याचा मोठा परिणाम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत दिसून आला. जेथे ओबीसी आणि दलित प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

परकीय शक्तींचा हात - खरे तर असे आरोप फार क्वचितच होत असतात, मात्र या लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा हात असल्याचेही भाजपच्या बैठकीत बोलले जात आहे. शिवराजसिंह चौहान आणि विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत राजस्थानात झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. एवढेच नाही, तर परकीय शक्तींना भारतातून भाजप आणि मोदी सरकार घालवायचे आहे, असेही या बैठकीत बोलले गेले होते. रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही असेच संकेत दिले.

काँग्रेसला आघाडीने सावरले - निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला परजीवी म्हटले होते. ते म्हणाले की, काँग्रेसकडे ताकद नाही, पण सहकारी पक्षांच्या मदतीने ती वाढली आहे. आता, भाजपचे नेतेही प्रत्येक राज्यात याचाच पुनरुच्चार करत आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांत काँग्रेसला आघाडीने सावरले. सरकार विरोधात जाणारी मते एकत्र आल्याने भाजपचे नुकसान झाले आणि काँग्रेसला फायदा झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम, मात्र... - जनतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम आहे. मात्र अतिआत्मविश्वास आणि अतर्गत वादा अथवा गटबाजी मुळे पक्षाचे नुकसान झाले आहे, असे भाजपमधील नेते एका सुराने म्हणत आहे.

योगी म्हणाले, अतिआत्मविश्वास नडला - अतिआत्मविश्वासामुळे पराभ झाल्याचे भाजपचे नेते म्हणत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही म्हटले आहे की, आम्ही अतिआत्मविश्वासत होतो. याचाच परिणाम आहे की, निवडणुकीच्या निकालानंतर, कुठेतरी कोपऱ्यात बसलेले विरोधक आक्रमक दिसत आहेत.

अंतर्गत गटबाजी - आढावा बैठकांमध्ये भाजपमधील अतर्गत वाद अथवा गटबाजीची जोरदार चर्चा होत आहे. याशिवाय, भाजपचे सरचिटणीस बीएल संतोष नुकतेच उत्तर प्रदेशात आले होते. तेव्हा अनेक नेत्यांनी, आपण अंतर्गत वाद अथवा गटबाजीमुळे अनेक जागा गमावल्याचे सांगितले होते. यात मुझफ्फरनगरसारख्या हायप्रोफाईल जागेचीही जबरदस्त चर्चा आहे.