Big Blow to BJP, Lok Sabha Result 2024: कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:30 PM 2024-06-04T17:30:55+5:30 2024-06-04T19:00:44+5:30
BJP got big blow in 7 states, Lok Sabha Election Result 2024 Live: भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विविध सात राज्यांमध्ये त्यांना अनपेक्षित निकालांचा सामना करावा लागला आणि २५० जागा मिळवतानाही दमछाक झाली. गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पर्वाचा अखेर आज मतमोजणीचा दिवस आला. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर ४००पारचा नारा देणाऱ्या भाजपाप्रणित एनडीएला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसले. भाजपाला काही राज्यांमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही. जाणून घेऊया त्याबद्दल...
उत्तर प्रदेश- देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसला. २०१९ मध्ये भाजपने ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी भाजपाला ५०% च्या जवळपास जागांवर आघाडी घेता आली. अखिलेश यादवांच्या सपाने २८ तर काँग्रेसने ६ जागांवर आघाडी घेतली.
बिहार- भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बिहारमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. २०१९ मध्ये भाजपाने १७ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र त्यांना १२ जागांवर आघाडी घेता आली. यावेळी जदयू १२ जागांवर, लोजप ५, राजद ४ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थान- राज्यातील अंतर्गत कलहाचा ट्रेंडनुसार भाजपला फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत राज्यातील २५ पैकी २४ जागा जिंकणारा भाजप यावेळी सुमारे १३च्या जागांवरच आघाडी मिळवू शकला. काँग्रेसने ९ जागांवर तर अपक्षांनी ३ जागांवर आघाडी घेतली.
महाराष्ट्र- महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला मतदारांनी नाकारले आणि महाविकास आघाडीला पसंती दर्शवली. गटबाजीमुळे राज्यात ४८ पैकी भाजपाला फक्त १२ जागांच्या आसपास आघाडी मिळाली. काँग्रेसने सुमारे १२ जागांवर, शिवसेना ठाकरे गटाने १० जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार ६ जागांवर तर शिवसेना शिंदे गट ६ जागांवर आघाडीवर घेतली.
हरयाणा- २०१९च्या लोकसभेत हरयाणाने सर्व १० जागा जिंकणारा भाजपा २०२४मध्ये संघर्ष करताना दिसला. मतमोजणीच्या कलांमध्ये भाजपाला केवळ ४ जागांवरच आघाडी घेता आली.
दिल्ली- २०१४ असो किंवा २०१९ असो, भाजपाने दिल्लीच्या सातही जागांवर आपले वर्चस्व राखले होते. पण यावेळी २०२४च्या निवडणुकीत भाजपाला ६ जागांवरच आघाडी मिळाली तर १ जागेवर पिछाडीचा सामना करावा लागला.
झारखंड- २०१९च्या झारखंडमध्ये भाजपाने १४ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी, २०२४मध्ये निवडणुकीच्या कलांमध्ये भाजपा केवळ ७ जागांवर आघाडी घेऊ शकली. तर जेएमएम २ जागांवर, काँग्रेस २ आणि एजेएसयू पक्षाने १ जागेवर आघाडी घेतली.