Bipin Rawat: हेलिकॉप्टर दुर्घटनेच्याआधी बिपिन रावत आणि पायलट यांच्यात काय झाला अखेरचा संवाद? By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:11 PM 2021-12-09T13:11:06+5:30 2021-12-09T13:16:24+5:30
Bipin Rawat Helicopter Accident: देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर आता या अपघाताचा तपास सुरु झाला आहे. बुधवारी तामिळनाडूच्या कुन्नूर इथं भारतीय वायूदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचं निधन झालं. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेकांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला.
हा अपघात नेमका झाला कसा? यासाठी घटनास्थळाची पाहणी करणाऱ्या टीमच्या हाती ब्लॅक बॉक्स सापडला आहे. ब्लॅक बॉक्स मध्ये व्हॉईस रेकॉर्डर असतो. ज्यात हेलिकॉप्टरमधील सर्व संवाद रेकॉर्ड होतो. पायलट वारंवार कंट्रोल रुमच्या संपर्कात असतात. त्यांचा संवादही यात रेकॉर्ड होतो.
दुर्घटनेच्या आधी हेलिकॉप्टरमध्ये काय संवाद सुरु होता? पायलटचा अपघाताची जाणीव झाली होती का? हे सगळं आता समोर येणार आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी हा ब्लॅक बॉक्स हाती लागला. दुर्घटनेच्या काही अंतरापर्यंत तपास टीम शोध कार्य करत होती.
या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि अन्य ११ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या सूत्रांनुसार संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्सचा तपास करण्याच्या दृष्टीने घटनास्थळापासून ३०० मीटर अंतराची तपासणी केली. मात्र त्यानंतर १ किमी परिसरात शोध घेतला तेव्हा हा बॉक्स सापडला.
ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अपघातापूर्वीची सगळी महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर दुर्घटना नेमकी कशी घडली. याचा उलगडा या ब्लॅक बॉक्समधून होऊ शकतो. देशातील सुरक्षित हेलिकॉप्टरचा अशा प्रकारे अपघात झाल्याने वायुदलातील अधिकारी व तज्ज्ञांनादेखील धक्का बसला आहे.
व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येणाऱ्या एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर तपासणी होते. सर्वोत्कृष्ट व विशेष प्रशिक्षित वैमानिक असतानादेखील अशा प्रकारे अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसाधारणत: एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर व्हीव्हीआयपी व व्हीआयपी मान्यवरांसाठी वापरण्यात येते. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरमध्ये दोन इंजिने असतात. या हेलिकॉप्टरसाठी उत्कृष्ट वैमानिकांची निवड होते व त्यांना अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते.
या हेलिकॉप्टरची प्रत्येक उड्डाणाअगोदर बारीक तपासणी होते. त्यासाठीदेखील वायुदलातील उत्कृष्ट कर्मचारी निवडण्यात येतात व त्यांच्याकडे मेंटेनन्सची जबाबदारी असते. भारतीय वायुदलाकडून एमआय १७ व्ही ५ या हेलिकॉप्टरचा हिमालयातील कठीण प्रदेशातदेखील सातत्याने उपयोग होतो.
इंजिन खराब झाले किंवा आपत्कालीन स्थिती आली तर सुरक्षित लँडिंग करण्याबाबत एमआय १७ व्ही ५ च्या वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा सरावदेखील होतो. वेळ कमी असताना प्रवाशांना कसे वाचवायचे, यात हे वैमानिक निपुण असतात.
वैमानिकाचे प्रशिक्षण मास्टर ग्रीन दर्जाचे असते. जर थोडी कल्पना आली असती व जवळपास मैदानी भाग असता तर त्यांनी लगेच हेलिकॉप्टर उतरविले असते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, या दुर्घटनेच्या काही सेकंदआधीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.