राजकीय विश्वातील भाऊ-बहिणी, ज्यांनी पाडली राज्य आणि देशाच्या राजकारणावर छाप By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 07:53 PM 2020-08-03T19:53:07+5:30 2020-08-03T20:15:36+5:30
राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. आज रक्षाबंधन. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा सण. बदलणाऱ्या काळासोबत आज बहिणीही भावांसोबत अनेक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा.
अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणातील भाऊ-बहिणींचे नाव घेतलं की, सर्वप्रथम नजरेसमोर नाव येतं ते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे. नात्याने चुलत भावंडे असली तरी दोघांच्या नात्यात सख्ख्या भावंडांएवढाच गोडवा आहे. तसेच दोघांनीही राज्य आणि देशाच्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे.
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्या चर्चेत असलेली दुसरी भावंडांची जोडी म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची. भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाची बाराखडी गिरवणाऱ्या पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय मार्ग पुढे वेगवेगळे झाले. मात्र दोघांनीही राज्य सरकारमध्ये मंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे.
राहुल गांधी-प्रियंका गांधी देशाच्या राजकारणाचा विचार केल्यास सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी हे सध्याच्या राष्ट्रीय राजकारणातील चर्चिंत भाऊ बहिणी आहेत. गे्ल्या काही काळापासून अडचणीचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाला योग्य दिशा देण्याचे काम दोघेही करत आहेत.
स्टॅलिन-कनिमोळी दक्षिणेकडील तामिळानाडूच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एम. करुणानिधी यांची अपत्ये असलेल्या स्टॅलिन आणि कनिमोळी यांनी डीएमके पक्षाच्या माध्यमातून तामिळनाडूमधील जनमानसात आपली छाप सोडली आहे. स्टॅलिन हे सध्या डीएमकेचे प्रमुख आहेत. तर कनिमोळी या यूपीए सरकारच्या काळात केंद्रात मंत्रिपदावर होत्या.
तेजस्वी यादव - मीसा भारती बिहारच्या राजकारणातील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या लालूप्रसाद यादव यांची अपत्ये असलेल्या तेजस्वी यादव आणि मीसा भारती यांचा सध्या राष्ट्रीय जनता दल पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये समावेश होतो. तेजस्वी यादव यांनी बिहारचे उपमुख्यमंत्रिपद भूषवले होते. तर मीसा भारती या लोकसभेच्या माजी खासदार राहिलेल्या आहेत.
विजय बहुगुणा आणि रीटा बहुगुणा जोशी दिवंगत नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या पश्चात विजय बहुगुणा आणि रीटी बहुगुणा जोशी यांनी उत्तराखंड आणि उत्तराखंडच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केलेली आहे. विजय बहगुणा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद सांभळले होते. तर रीटा बहुगुणा जोशी या सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.
माधवराव शिंदे-वसुंधरा राजे भारताच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली भावंडे म्हणून माधवराव शिंदे आणि त्यांच्या भगिनी वसुंधरा राजे यांचे नाव घेता येईल. दिवंगत माधवराव शिंदे यांनी केंद्रात विविध मंत्रिपदांवर काम केले होते. तर त्यांच्या भगिनी वसुंधरा राजे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्याबरोबरच या दोघांच्याही भगिनी यशोधरा राजे यांनी मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे.
जवाहरलाल नेहरू आणि विजयालक्ष्मी पंडित देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांनी त्या काळात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप तत्कालीन भारतीय राजकारणावर पाडली होती.