अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; या नद्यांवर 9 पूल अन् पहिला बोगदा तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 07:05 PM2024-07-16T19:05:17+5:302024-07-16T19:12:55+5:30

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद या 508 किमी लांब बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे.

Bullet Train : भारतातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत नवीन अपडेट आली आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात कोलक नदीवर 160 मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा एकूण कॉरिडॉर 508 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावर येणाऱ्या नद्यांवर 24 पूल बांधण्यात येणार असून, यातील नऊ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

NHSRCL ने दिलेल्या माहितीनुसार, वलसाडमधील पार आणि औरंगा, नवसारीतील पूर्णा, मिंधोला, अंबिका आणि वेंगानिया, खेडामधील मोहर आणि वडोदरा जिल्ह्यातील धाधर, या नद्यांवर पूल बांधण्यात आले आहेत. तरर, नर्मदा, ताप्ती, मही आणि साबरमती नद्यांवर पूल बांधण्याचे काम सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये 12 स्थानके असतील. त्यापैकी आठ गुजरातमध्ये आणि चार महाराष्ट्रात असतील. गुजरातमध्ये साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा आणि वापी ही स्थानके आहेत, तर महाराष्ट्रात बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई येथे स्थानके बांधली जातील. या सर्व स्थानकांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील आठही स्थानकांवर पायाभरणीचे काम पूर्ण झाली आहे.

NHSRCL ने आपल्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, 2 जुलैपर्यंत सर्व कंत्राटे देण्यात आली आहेत आणि 190 किमी मार्गाचे आणि 321 किमी घाटाचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी लागणारी जमीन गुजरात, दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्रात संपादित करण्यात आली आहे.

वलसाडच्या जरोली गावाजवळ 350 मीटर लांबीचा पहिला बोगदादेखील पूर्ण झाला आहे. याशिवाय देशातील पहिल्या सात किलोमीटर लांबीच्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याचे काम सुरू झाले आहे. हा बोगदा महाराष्ट्रातील बीकेसी आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या बोगद्याचा भाग आहे.

2026 पर्यंत दक्षिण गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा चालवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर 2017 रोजी गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी केली होती.