अपघातग्रस्त होऊन पुलावरून नदीत कोसळली बस, भीषण अपघातात प्रवाशांनी असा वाचवला जीव By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:32 PM 2021-07-09T23:32:31+5:30 2021-07-09T23:44:00+5:30
Accident News: एक वेगवान रेडवेज बस नियंत्रण सुटून पुलावरून नदीमध्ये कोसळली. त्यानंतर ही बस नदीमध्ये उभी राहिली. हा अपघात पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे पावसादरम्यान एक वेगवान रेडवेज बस नियंत्रण सुटून पुलावरून नदीमध्ये कोसळली. त्यानंतर ही बस नदीमध्ये उभी राहिली. हा अपघात पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. दरम्यान, बसमध्ये अडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळावर मदतकार्य सुरू केले.
हा अपघात कानपूरमधील बिल्हौरीमधील जीटी रोडवर झाला. अपघात झाला तेव्हा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्याचवेळी प्रवाशांना घेऊन जात असलेल्या बसचे नियंत्रण सुटले आणि ही बस घसरून नदीच्या पुलावरील कठड्याला ठोकर देऊन नदीमध्ये कोसळली.
सुदैवाने ही बस नदीमध्ये पलटी झाली नाही. तर नदीमध्ये पडून उभी राहिली. या अपघातानंतर बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. तर अपघात पाहून स्थानिकांनी बसच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर भर पावसात मदतकार्य सुरू करून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात झाली.
या अपघातामुळे बसमधून प्रवास करत असलेले प्रवाशी खूप घाबरले. बसमधून बाहेर पडण्यासाठी कुणी खिडकीच्या काचा तोडू लागला तर कुणी नदीमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र या दरम्यान, महिलांना मदतीसाठी वाट पाहावी लागली.
दरम्यान, ग्रामस्थांनी अपघातग्रस्त बस नदीत पडू नये म्हणून बसच्या एका बाजूला दोरखंडाने बांधून ठेवले. तसेच महिलांना बाहेर काढण्यासाठी एका शिडीची मदत घेण्यात आली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सुदैवाची बाब म्हणजे जिथे अपघात झाला तिथे नदीमध्ये पाणी कमी होते. त्यामुळे बसमध्ये अडकलेले प्रवासी सुखरूपपणे बाहेर येऊ शकले.