वर्षातून दोनदा होणार दहावीची परीक्षा? CBSE नवा नियम लागू करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:55 IST2025-02-19T14:43:36+5:302025-02-19T14:55:36+5:30

CBSE New Rule: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी बोर्ड परीक्षांचे आयोजन केले जाते. या वर्षी सीबीएसई बोर्डाने १५ फेब्रुवारी २०२५ पासून दहावीच्या परीक्षा सुरू केल्या आहेत. अशातच दहावी बोर्डाच्या परीक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. सीबीएसईने २०२६ पासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच सीबीएसईचे अधिकारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. दोनदा परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाची यावेळी चर्चा करण्यात आली.

एखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा काही कारणाने त्याची परीक्षा चुकली तर तो पुन्हा परीक्षेला बसू शकतो. त्याचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल, त्यावर लोकांकडून सूचना मागवल्या जातील.

"अनेक उपक्रमांद्वारे, सीबीएसई असे शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जे लक्षात ठेवण्याऐवजी मुलांच्या विचारक्षमतेवर आणि समजून घेण्यावर अधिक भर देईल," असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सीबीएसई २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून २६० परदेशी शाळांसाठी जागतिक अभ्यासक्रम देखील सुरू करणार आहे. या नवीन मूल्यमापन मॉडेलमध्ये सहजतेने बदल करण्यासाठी सीबीएसई शिक्षकांच्या प्रशिक्षणातही गुंतवणूक करत आहे.

"तणावमुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ही आवश्यक पावले आहेत. परीक्षांमध्ये सुधारणा आणि बदल हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सुधारणांमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत होईल," असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं.

दुसरीकडे, सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षासंदर्भात सूचना देणाऱ्या शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शाळांना OECMS पोर्टलवर फीडबॅक अपलोड करावा लागणार आहे. तसेच सीबीएसई ने शाळांना अतिरिक्त प्रश्नांसाठी qpoobservation@cbseshiksha.in वर ईमेल करण्यास सांगितले आहे.

सीबीएसईने विद्यार्थ्यांना आणि इतर संबंधित असणाऱ्यांना पेपर लीक आणि परीक्षेतील गैरप्रकाराशी संबंधित चुकीच्या माहितीपासून सावध करत एक सल्ला दिला आहे. सर्वांनी फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन सीबीएसईने केले आहे.