Corona Vaccine : केंद्र सरकार यापुढे खरेदी करणार नाही कोरोना लस; तिसर्या डोसबाबत दिल्या 'या' सूचना By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 05:56 PM 2023-04-12T17:56:55+5:30 2023-04-12T18:15:58+5:30
Corona Vaccine : लसीकरण मोहिमेअंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी कोविड लस मोफत उपलब्ध करून दिली होती. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडून अनेक प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येत आहेत. दरम्यान, आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र सरकार यापुढे फार्मा कंपन्यांकडून कोविड-19 लस खरेदी करणार नाही.
बुधवारी, केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या सूत्रांनी इंडिया टुडे/आज तकला सांगितले की, सरकारने सामान्य लोकांना लसीचा तिसरा आणि चौथा डोस न घेण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांनुसार, आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की कोरोना XBB.1.16 चे सध्याचे सब व्हेरिएंट फार धोकादायक नाही आणि यामुळे लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.
फक्त आजारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना धोका असू शकतो. म्हणूनच सरकारने ठरवले आहे की आता कोणतीही लस खरेदी करण्याची गरज नाही. यासोबतच महाराष्ट्रासह इतर राज्यांना ही लस स्वतः खरेदी करण्यास सांगितले आहे.
लसीचा तिसरा डोस फक्त आजारी किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी केंद्र सरकारने देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू केली होती.
लसीकरण मोहिमेअंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी कोविड लस मोफत उपलब्ध करून दिली होती. परंतु 2022-23 च्या अर्थसंकल्पात मंत्रालयाने लसीकरणासाठी तरतूद केलेल्या बजेटपैकी 4,237 कोटी रुपये म्हणजेच एकूण वाटप केलेल्या बजेटपैकी 85 टक्के रक्कम अर्थ मंत्रालयाला परत केली होती.
मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. अनेक महिन्यांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत होते, मात्र गेल्या काही आठवड्यांपासून संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 7,830 नवीन रुग्ण आढळले आहेत. 233 दिवसांनी हा प्रकार घडला आहे.
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 7,946 रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मंगळवारी देशभरात 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच वेळी, संसर्ग दर देखील 3.65 टक्क्यांवर आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, एक भयावह गोष्ट देखील समोर आली आहे की ओमायक्रॉनच्या XBB.1.16 या सब व्हेरिएंटमध्ये म्यूटेशन झाले आहे.
आता आणखी एक नवीन सब-व्हेरिएंट XBB.1.16.1 समोर आला आहे. भारतातील कोरोना प्रकरणांच्या जीनोम सिक्वेन्सिंग (INSACOG) करण्यात आले. त्यात म्हटले आहे की म्यूटेटेड सब व्हेरिएंट XBB.1.16.1 ची 234 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
INSACOG च्या मते, दिल्ली, गुजरात आणि हरियाणासह 13 राज्यांमध्ये या नवीन सब व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. प्रत्येक व्हायरस बदलतो. म्यूटेशनमुळे त्याची नवीन रूपे समोर येतात. Omicron चे sub-variant XBB.1.16 हे भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते.
XBB.1.16.1 सब-व्हेरिएंट XBB.1.16 चं म्यूटेटेड व्हर्जन आहे. INSACOG नुसार, XBB.1.16 हा सब-व्हेरिएंट देशातील 22 राज्यांमधील 1 हजार 744 नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. आतापर्यंत, XBB.1.16.1 अधिक गंभीर रोग होऊ शकतो किंवा नाही याचा कोणताही पुरावा नाही. भारतातच, Omicron चे 400 हून सब-व्हेरिएंट समोर आले आहेत. त्यापैकी 90 टक्के XBB आहेत.
कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले असताना आता पुन्हा नवी लाट येणार की काय अशी भीतीही वाढली आहे. मात्र, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. सध्या घाबरण्याची गरज नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृतांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसल्याचे त्यांचे मत आहे.