ED एन्ट्रीमुळे बदललं चंपई सोरेन यांचं नशीब; मुख्यमंत्री बनताच किती सॅलरी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 05:11 PM2024-02-05T17:11:52+5:302024-02-05T17:16:43+5:30

आयुष्यात कधी कुणाचं नशीब बदलेल सांगता येत नाही. झारखंडच्या राजकारणात तेच घडलं. जिथं एका आठवडाभरात सोरेन यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले तर याच राजकीय घडामोडीत एका नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

झारखंडचे नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो हे जाणून घेऊया. प्रत्येक राज्यात मुख्यमंत्र्यांचा पगार हा वेगळा असतो. झारखंडबाबत बोलायचं झालं तर याठिकाणी सर्व भत्ते मिळून जवळपास २.३० लाख रुपये पगार मुख्यमंत्र्यांना मिळतो.

अलीकडेच झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा पगार वाढवण्याचा प्रस्तावही आला होता. ज्यात मुख्यमंत्र्याचे मूळ वेतन ८० हजाराहून १ लाख करण्याचा प्रस्ताव होता. प्रस्तावात भत्ता वाढवण्याचीही शिफारस केली होती. त्यात हॉस्पिटॅलिटी अलाऊंस ६० हजाराहून ७० हजार रुपये, प्रादेशिक भत्ता ८० हजाराहून ९५ हजारापर्यंत वाढवण्यात आला.

त्यानुसार झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना प्रति महिना अडीच ते पावणे तीन लाख पगार मिळतो. मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांसोबत ३ हवाई यात्रा आणि शिप यात्रा करू शकतात. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांना नवीन गाडी खरेदी करण्यासाठी ४ टक्के व्याजाने २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

घर खरेदी करण्यासाठी ५० लाखांचे कर्जही अवघ्या ४ टक्के व्याजाने दिले जाते. या लाभासोबत अन्य अनेक लाभ आहेत. आता हे सर्व लाभ चंपई सोरेन यांना मिळणार आहेत. झारखंडच्या राजकीय मैदानात ईडीच्या एन्ट्रीनंतर मागील काही दिवसांत राजकीय भूकंप घडला.

अखेर हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर व्हावे लागले. त्यानंतर आदिवासी नेते चंपई सोरेन यांना ही जबाबदारी मिळाली. याआधी चंपई सोरेन यांनी अनेक मंत्रिपदे सांभाळली आहेत. संपत्तीच्या बाबतीत चंपई सोरेन हे हेमंत सोरेन यांच्या कित्येक पटीने मागे आहेत. चंपई सोरेन यांची एकूण संपत्ती २ कोटी इतकी आहे.

१० वी उत्तीर्ण CM चंपई सोरेन यांच्या संपत्तीबाबत अशी माहिती की, २०१९ च्या निवडणूक शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे २.२८ कोटी रुपयांची स्थावर अस्थावर मालमत्ता आहे. त्यात ७० हजारांची रोकड आहे. तर पत्नी आणि मुलांसह त्यांच्या बँक खात्यात ६० लाख १९ हजार रुपये आहेत. तर त्यांच्यावर ७६ लाखांचे कर्ज आहे.

चंपई सोरेन यांनी कुठल्याही शेअर्समध्ये गुंतवणूक केली नाही. त्यांच्या नावावर ३ वाहने आहेत. ज्यात टॉयोटा फॉर्च्युनरची किंमत ३४ लाख आहे. तर इतर २ वाहने पत्नीच्या नावावर आहेत. ज्यांची किंमत ६६ लाखांच्या आसपास आहे. ज्वेलरी ४० ग्रॅम सोने १ लाख २३ हजारचे आहेत. तर पत्नीच्या नावे ५ लाखांचे दागिने आहेत

चंपई सोरेन यांच्याकडे २.५० लाख रुपयांचे शस्त्रे आहेत. त्यात १ लाखाची पिस्तुल, ९५ हजारांची रायफल आणि ४५ हजारांची डबल बॅरेल बंदूक आहे. जंगम मालमत्तेत चंपई सोरेन यांच्याकडे ३९ लाख ५२ हजारांची शेतजमीन आहे. ९ लाख किंमतीचे एक घर आहे.

तर पत्नीच्या नावे ४ लाख ४२ हजारांची एक बागायत जमीन आहे. मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्याकडे एकूण संपत्ती २ कोटीच्या आसपास आहे. परंतु चंपई सोरेन यांच्यावर ७६ लाखांचे कर्जदेखील आहे.