देशातील टॉप-५ श्रीमंत आमदारांमध्ये समावेश; आता भ्रष्टाचारप्रकरणी अटक; चंद्राबाबू नायडूंची संपत्ती माहित्येय? By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 04:03 PM 2023-09-09T16:03:41+5:30 2023-09-09T16:07:59+5:30
chandrababu naidu photos : कौशल्य विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ५५० कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.
खरं तर माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत पाच आमदारांपैकी एक आहेत. त्यांची संपत्ती शेकडो कोटीच्या घरात आहे.
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर ११८ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला. त्याशिवाय त्यांच्यावर ३५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचाही आरोप आहे. कौशल्य विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी करण्यात आले आहे.
कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. ते तेलुगु देसम पक्षाचे अध्यक्ष असून देशातील टॉप-५ श्रीमंत आमदारांमध्ये त्यांची गणना केली जाते.
कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे ते मालक आहेत. चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशातील चित्तूरमधील कुप्पम मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
लक्षणीय बाब म्हणजे संपूर्ण भारतात चंद्राबाबू नायडूंपेक्षा जास्त संपत्ती असलेले केवळ तीन आमदार आहेत. हे तिन्ही आमदार दक्षिणेतील राज्यांतील आहेत.
चंद्राबाबू नायडूंची एकूण संपत्ती किती? निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांच्याकडे एकूण ६६८.५७ कोटी एवढी संपत्ती आहे. यापैकी त्यांच्याकडे हेरिटेज फूड्स लिमिटेड कंपनीतील हिस्सेदारीमुळे सुमारे ५४५ कोटी रुपये आहेत.
त्यांच्याकडे कंपनीचे १,०६,६१,६५२ शेअर्स आहेत. दरम्यान, २०१९ निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या वेळी त्यांच्या शेअर्सचे मूल्य ५११.९० रुपये होते. मात्र, सध्या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य २७३ रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे आताच्या घडीला चंद्राबाबू नायडू यांच्या मालमत्तेतील या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य २८९ कोटी रुपये इतके कमी झाले आहे.
याशिवाय त्यांच्याकडे विजया बँकेचे १०० शेअर्स आहेत, जे आता बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाले आहेत. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात जवळपास ४५ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले होते. तर, त्यांच्या पत्नीच्या खात्यात १६ लाख जमा करण्यात आले.
आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी चैनीच्या वस्तूंमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे दोन कोटी रूपयांचे सोने, चांदी, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू आहेत.
याशिवाय त्यांच्या संपत्तीमध्ये ४५ कोटी रुपयांची शेतजमीन, २९ कोटी रुपयांच्या व्यावसायिक इमारती आणि १९ कोटी रुपयांच्या निवासी इमारतींचा समावेश आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे एकूण ९४ कोटी रुपयांच्या मालमत्तेची नोंद आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत आमदारामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा नंबर लागतो. त्यांची एकूण संपत्ती १४१३ कोटी आहे.