'मिशन मून'मध्ये मिळालं मोठं यश; 'चंद्रयान ३' कुठपर्यंत पोहचलं?, ISRO ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 02:44 PM2023-07-17T14:44:12+5:302023-07-17T14:49:34+5:30

भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) शास्त्रज्ञांनी शनिवारी चंद्रयान ३ ला चंद्राच्या कक्षेत नेण्याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला. चंद्रयान-३ ची स्थिती सामान्य आहे. चंद्रयान-३ आता ४१,७६२ किमी बाय १७३ किमी कक्षेत आहे.

ISRO ने १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून तिसरी चंद्र मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली. चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल, ज्याचा आतापर्यंत फारसा शोध लागला नाही. आतापर्यंत केवळ तीन देश - अमेरिका, चीन आणि रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यशस्वी झाले आहेत.

ISRO संचालक एस उन्नीकृष्णन नायर यांनी सांगितले की, शुक्रवारी प्रक्षेपित करण्यात आलेली ऐतिहासिक 'चंद्रयान-३' मोहीम ४० दिवसांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जाईल आणि शेवटी त्याच्या थ्रस्टरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चंद्रयान-३ ने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि अंतराळ यानासाठी आवश्यक असलेल्या सुरुवातीच्या अटी 'अत्यंत अचूक' पुरवल्या गेल्या आहेत.

आजपासून चंद्रयानमध्ये बसवलेले थ्रस्टर्स 'फायर' केले जातील आणि २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर 'लँडिंग' करण्यासाठी चंद्रयान-३ पृथ्वीपासून दूर नेले जाईल. चंद्रयान-३ च्या यंत्रणेने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या टप्प्यातील प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला आहे. अंतराळ यानही खूप चांगल्या स्थितीत आहे त्यामुळे ते चंद्रावर जाण्यास सक्षम असेल असं नायर यांनी सांगितले.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने सोमवारी दुपारी १.१४ वाजता हे अपडेट दिले. इस्रोच्या मते, चंद्रयान-३ चे स्थान आता ४१६०३ किमी x २२६ कक्षेत आहे. ते पृथ्वीभोवती फिरेल आणि त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपासून दूर जाईल. पुढील फायरिंग मंगळवारी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान होईल

जर इस्रोच्या ६०० कोटी रुपयांच्या चंद्रयान-३ मोहिमेला लँडर उतरवण्यात यश आल्यास, चंद्राच्या पृष्ठभागावर 'सॉफ्ट-लँडिंग' तंत्रात प्रभुत्व मिळवणारा अमेरिका, चीन आणि माजी सोव्हिएत युनियननंतर भारत हा चौथा देश बनेल.

चंद्रयान-२ 'सॉफ्ट लँडिंग' करण्यात अयशस्वी झाला जेव्हा त्याचे लँडर 'विक्रम' ७ सप्टेंबर २०१९ रोजी 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करत असताना ब्रेकिंग सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. चंद्रयान-१ मोहीम २००८ मध्ये केली होती. इस्रोची पंधरा वर्षांतील ही तिसरी चंद्र मोहीम आहे.

चंद्रयान-३ मोहिमेमुळे विविध ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी भारत आखणार असणाऱ्या भावी मोहिमांचा मार्गही सुकर होणार आहे. चंद्रयान-३ सोबत असलेल्या रंभा, इस्ला आदी सहा शास्त्रीय उपकरणांमुळे इस्रोला चंद्रावरील मातीच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे, तसेच चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीची छायाचित्रे टिपता येणार आहेत.

चंद्रयान-३वरील रंभा व इल्सा ही उपकरणे १४ दिवसांच्या मोहिमेत विविध प्रयोग करणार आहेत. चंद्रावरील वातावरणाचा व त्या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या पोटात असलेल्या खनिजांचा अभ्यास केला जाईल. लुनार लँडर विक्रम हा प्रज्ञान रोव्हरची छायाचित्रे टिपणार आहे.

चंद्रावर रात्री उणे २३२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते. तिथे १४ दिवस खूप कमी तापमानात कार्यरत असताना रोव्हरमधील उपकरणे नीट सुरू राहिली तर त्यामुळे स्पेसक्राफ्टचे आयुष्य वाढणार आहे, असे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.