दोन टप्प्यात Chandrayaan-4 ची लॉन्चिंग, अंतराळात जोडणार पार्ट्स; ISRO प्रमुखांचा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 02:59 PM 2024-06-27T14:59:25+5:30 2024-06-27T15:04:16+5:30
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 दोन टप्प्यात लॉन्च केले जाईल. हे तंत्रज्ञान भविष्यात भारतीय अंतराळ स्थानकाच्या उभारणीत मोठी मदत करेल. ISRO News : भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ISRO पहिल्यांदाच असा प्रयोग करणार आहे, जो यापूर्वी कधीही झाला नाही. Chandrayaan-3 च्या यशानंतर इस्रो Chandrayaan-4 च्या तयारीला लागले आहे. आता याच Chandrayaan-4 बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
हे Chandrayaan-4 तुकड्यांमध्ये अवकाशात पाठवले जाणार आहे. म्हणजे, याचे एक-एक भाग अंतराळात पाठवले जातील आणि तिथेच त्याला जोडले जाईल. ISRO चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला आहे.
इस्रो प्रमुख म्हणाले की, Chandrayaan-4 एकाच टप्प्यात प्रक्षेपित होणार नाही. याचे भाग दोन टप्प्यात अंतराळात सोडले जातील. यानंतर चंद्राच्या दिशेने जाताना यानाचे भाग जोडले जातील. त्याचा फायदा असा होईल की, भविष्यात ISRO आपले स्पेस स्टेशन या पद्धतीनेच जोडून तयार करेल. म्हणजेच, Chandrayaan-4 चे भाग अंतराळात जोडून इस्रो भविष्यात अंतराळ स्थानक तयार करण्याचे तंत्रज्ञान आणि क्षमता आत्मसात करेल. त्यामुळेच ही Chandrayaan-4 मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे.
डॉ. सोमनाथ पुढे म्हणाले की, आम्ही चांद्रयान-4 साठी सर्व नियोजन केले आहे. ते कसे सुरू करायचे? कोणता भाग कधी सुरू होईल? अंतराळात कसे जोडले जाईल? चंद्रावर कसे उतरवले जाईल? तिथे कोणता भाग राहील? कोणता भाग नमुना घेऊन पृथ्वीवर परत येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहेत. Chandrayaan-4 एकाचवेळी प्रक्षेपित करण्याइतके शक्तिशाली रॉकेट भारताकडे नाही, त्यामुळेच त्याला दोन टप्प्यात पाठवले जाणार आहे.
भारताकडे डॉकिंग, म्हणजेच अंतराळ यानाचे भाग जोडण्याचे तंत्रज्ञान आहे. हे काम पृथ्वीच्या कक्षेत किंवा चंद्राच्या कक्षेत करता येते. हे तंत्रज्ञान भारताने विकसित के आहे. डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यासाठी इस्रो या वर्षाच्या अखेरीस स्पेडेक्स मिशन पाठवेल. चंद्रावरील मोहीम पूर्ण करून पृथ्वीवर परत येताना डॉकिंग मॅन्युव्हर ही एक नियमित प्रक्रिया आहे. हे काम आम्ही यापूर्वीही केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, इस्रो 2035 पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. हे स्पेस स्टेशन अनेक तुकड्यांमध्ये प्रक्षेपित केले जाईल आणि अवकाशात एकत्र जोडले जाईल. त्याचा पहिला भाग LVM3 रॉकेटद्वारे अवकाशात पाठवला जाईल. 2028 मध्ये त्याचे पहिले प्रक्षेपण होईल अशी अपेक्षा आहे.
त्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. भारतीय अंतराळ स्थानक पाच वेगवेगळ्या भागांना जोडून तयार केले जाणार आहे. ज्यावर आमचे शास्त्रज्ञ काम करत आहेत. 2040 पर्यंत आपल्या तंत्रज्ञानाने आणि क्षमतेने आपण एका भारतीयाला चंद्रावर पाठवू शकतो, असा विश्वास डॉ. एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला.