Changes from 1 November 2021: बँक व्यवहारांपासून, रेल्वेच्या वेळापत्रकापर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार हे पाच नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 14:07 IST2021-10-30T13:58:50+5:302021-10-30T14:07:52+5:30
Changes from 1 November 2021: या बदलांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात १ नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या नियमांविषयी.

सोमवारपासून नव्या महिन्याला सुरुवात होत आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून बँकेत पैसे जमा करण्यापासून पैसे काढण्यापर्यंतच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याबरोबरच रेल्वेचे टाईम टेबल, गॅस बुकिंगचे नियमही बदलणार आहेत. या बदलांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात १ नोव्हेंबरपासून बदलणाऱ्या नियमांविषयी.
बँकिंग संबंधीच्या नियमांमध्ये बदल
आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठीठी आणि काढण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. याची सुरुवात बँक ऑफ बडोदाने केली आहे. पुढच्या महिन्यापासून निर्धारित सीमेपेक्षा अधिक बँकिंग करण्यावर वेगळे शुल्क लागते. १ नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्जखात्यासाठी १५० रुपये द्यावे लागतील. खातेधारकांसाठी तीन वेळेपर्यंत रक्कम जमा करणे निशुल्क असेल. मात्र जर ग्राहकाने चौथ्या वेळी पैसे जमा केल्यास ग्राहकांना ४० रुपये जमा करावे लागतील. तर जनधन खातेधारकांना यामध्ये काही सुट देण्यात आली आहे. त्यांना पैसे जमा करण्यावर कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र पैसे काढल्यावर १०० रुपये शुल्क द्यावे लागेल.
गॅस सिलेंडरच्या किमती
१ नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. एलपीजीच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते. माध्यमांतील बातम्यांनुसार एलपीजीच्या विक्रीमधून होणाऱ्या नुकसानाचा विचार करून सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढ करू शकते.
रेल्वेचे वेळापत्रक बदलणार
भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करणार आहे. आधी १ ऑक्टोबरपासून हा बदल करण्यात येणार होता. मात्र आता १ नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर १३ हजार प्रवासी गाड्या आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. तसेच देशात चालणाऱ्या सुमारे ३० राजधानी ट्रेनच्या वेळापत्रकामध्येही १ नोव्हेंबरपासून बदल होणार आहे.
गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी द्यावा लागेल ओटीपी
१ नोव्हेंबरपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीची पूर्ण प्रक्रिया बदलणार आहे. गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना मोबाईल नंबरवर १ ओटीपी पाठवला जाईल. जेव्हा सिलेंडर डिलिव्हरीसाठी येईल. तेव्हा तुम्हाला हा ओटीपी डिलिव्हरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. एकदा हा कोड सिस्टिममध्ये जुळला की ग्राहकाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल.
या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार
१ नोव्हेंबरपासून काही आयफोन आणि अँड्रॉईड फोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणे बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपवर दिलेल्या माहितीनुसार १ नोव्हेंबरपासून फेसबुकची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप अँड्रॉईड Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 वर सपोर्ट करणार नाही.