सोशल मीडिया अकाऊंटसाठी 18 वर्षाखाली मुलांना घ्यावी लागणार आईवडिलांची परवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 01:16 IST2025-01-04T01:11:35+5:302025-01-04T01:16:18+5:30
Digital Personal Data Protection Rules: केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यात १८ वर्षांखालील मुलांसाठी महत्त्वाचा नियम घालण्यात आला आहे.

सोशल मीडियावरील अल्पवयीन मुलांची सक्रिया वाढली असून, त्याचे अनेक दुष्परिणामही दिसत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारकडून आता मोठा निर्णय घेतला आहे.
आता १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यासाठी आईवडिलांची परवानगी घ्यावीच लागणार आहे.
ही तरतूद केंद्राच्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम २०२३ च्या मसुद्यातील नियमात करण्यात आली आहे. यासंदर्भातील केंद्राने शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, मसुद्यातील नियमांबद्दल लोकांनी त्यांच्या सूचना आणि आक्षेप असतील, तर ते सरकारला सांगावेत.
या नियमांबद्दल लोकांना त्यांच्या सूचना किंवा तक्रारी असतील, तर MyGov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदवता येणार आहेत. १८ फेब्रुवारी २०२५ नंतर या तक्रारी आणि सूचनांचा विचार केला जाणार आहे.
या नियमांचे पालन केले जाईल, यावर देखरेख करण्यासाठी सरकार एक डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन करणार आहे. डिजिटल बोर्ड व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी करेल.
नियमांचं उल्लंघन झाले असेल, तर त्याची चौकशी करून संबंधितांना दंड केला जाईल. लहान मुलांच्या डेटा वापरावर लक्ष्य देण्याबरोबरच ग्राहकांचा डेटा संकलित करणाऱ्या कंपन्यांबद्दलचे नियमही कडक केले जाणार आहेत.