India China Face Off: तुमच्या बाजूनं एकही गोळी झाडली गेली तर...; चीनची भारताला थेट धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:55 AM2020-06-22T11:55:30+5:302020-06-22T12:05:23+5:30

लडाखच्या सीमावर्ती भागात चीनच्या कुरघोड्या सुरूच असल्यानं भारतानं चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली.

गलवान भागात गेल्या आठवड्यात झालेली झटापट पाहता भारतानं सीमेवरील फौजफाटा वाढवला. चिनी सैन्याकडून आगळीक झाल्यास जशासं तसं प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारनं लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे.

गरज पडल्यास प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्याचे अधिकार जवानांना देण्यात आले आहेत. यानंतर चीनकडून अपेक्षित प्रतिक्रिया आली आहे.

चीन सरकारची भाषा बोलणाऱ्या ग्लोबल टाईम्स वृत्तपत्रानं भारताला थेट धमकी दिली आहे. भारतीय सैनिकांनी गोळीबार केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असा इशाराच ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.

चिनी वृत्तपत्रानं आपल्या संपादकीय लेखात भारताला १९६२ ची आठवण करून दिली आहे. चिनी सैन्य आणि चिनी अर्थव्यवस्था दोन्ही भारताच्या तुलनेत अतिशय मजबूत स्थितीत असल्याचं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

गोळीबार करण्याचे आदेश प्रत्यक्षात आल्यास तर भारत-चीन सैन्यातील कराराचं उल्लंघन होईल. सीमेवर कधीकधी झटापट होते. मात्र कित्येक दशकांपासून सीमेवर गोळीबार झालेला नाही, असं ग्लोबल टाईम्सनं लिहिलं आहे.

भारतीय सैन्यानं चिनी सैन्याविरोधात शस्त्रांचा वापर केल्यास सीमावर्ती भागांमधील चित्र पूर्णपणे वेगळं असेल, अशी थेट धमकी देण्यात आली आहे.

१९६२ आणि आताची परिस्थिती फारशी वेगळी नाही. चिनी सैन्य भारताच्या तुलनेत जास्त मजबूत आणि अत्याधुनिक आहे. चीनचा जीडीपी भारताच्या पाचपट, तर सैन्यावरील खर्च भारताच्या तिप्पट आहे, अशी आकडेवारी ग्लोबल टाईम्सनं दिली आहे.

ग्लोबल टाईम्सनं भारताची तुलना अंड्याशी केली आहे. भारतानं चीनसोबतचा वाद वाढवला आणि युद्धाला तोंड फुटलं तर अंड डोंगराला आपटल्यासारखी स्थिती निर्माण होईल, असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

चीनला तणाव वाढवण्याची इच्छा नाही. मात्र भारतानं चिथावणी देणारी कोणतीही कृती केल्यास कारवाई करण्यास चिनी सैन्य सक्षम आहे. त्यामुळे भारतानं सीमावाद वाढवू नये, तो नियंत्रणात ठेवावा, असा सल्ला ग्लोबल टाईम्सनं दिला आहे.

गलवान परिसरात चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीनंतर भारत सरकारनं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जवानांना फ्री हँड दिला आहे. त्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

नव्या नियमांनुसार विशेष परिस्थितीत हत्यारांचा वापर करण्याचे अधिकार फिल्ड कमांडर्सकडे असतील.